नागपुरात भाजप प्रस्थापित असेल तर त्यांच्याविरोधात लढावं लागेल - राज ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2022 12:46 PM2022-09-19T12:46:18+5:302022-09-19T12:51:05+5:30
नागपुरातील मनसेची सर्व पदं बरखास्त करण्याची घोषणा; नवीन कार्यकारिणी जाहीर करणार
नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे १८ सप्टेंबरपासून पाच दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विदर्भात पक्ष बांधणीसाठी राज ठाकरेंचा प्रयत्न सुरू आहे. आज त्यांनी नागपुरातील रवि भवन येथे माध्यमांशी संवाद साधला.
कोरोना काळानंतर पहिल्यांदाच नागपुरात आलोय. काल पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा केली. ज्याप्रकारने नागपुरात पक्षाची बळकटी दिसायला हवी होती ती दिसत नाहीये. काल अनेकांनी स्थानिक नेतृत्वाबाबत नाराजी व्यक्त केली होती. ते पाहता नागपुरातील मनसेची सर्व प्रमुख पदं बरखास्त करतोय. २६-२७ सप्टेंबरला घटस्थापनेच्या दिवशी नवीन कार्यकारिणी जाहीर करणार असून नवीन तरुणांना कार्यकारीणीत संधी देणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली.
विदर्भ आधी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा मात्र आता आज जर भाजपचा गड झाला असेल तर, तो सत्ताधाऱ्यांच्या विरोधात केलेल्या संघर्षातून त्यांच्या हाती आला आहे. प्रत्येकजण ज्यावेळी मोठा होतो त्यावेळी प्रस्थापितांच्या विरोधात जाऊनच होतो. प्रस्थापित सत्तेला आव्हान दिल्याशिवाय मोठं होता येत नाही. त्यामुळे आम्ही नागपुरात भाजपविरुद्ध लढणार, असे ठाकरे म्हणाले.