coronavirus; शहर स्वच्छ तर आपले आरोग्य चांगले; कचरा स्वत:च साफ करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 10:45 AM2020-03-18T10:45:45+5:302020-03-18T10:48:21+5:30

परिसर स्वच्छ असेल तर आरोग्य चांगले राहील, अन्यथा दुर्गंधी व घाणीमुळे विविध आजारांना सामोरे जावे लागेल.

If the city is clean, your health is good | coronavirus; शहर स्वच्छ तर आपले आरोग्य चांगले; कचरा स्वत:च साफ करा!

coronavirus; शहर स्वच्छ तर आपले आरोग्य चांगले; कचरा स्वत:च साफ करा!

googlenewsNext
ठळक मुद्देकुटुंबीयांच्या आरोग्यासाठी घर व परिसर स्वच्छ ठेवा सार्वजनिक ठिकाणी वा दुसऱ्याच्या घराजवळ कचरा टाकू नका

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाची देशभरात दहशत पसरली आहे. बचावासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनाही खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे’ म्हणीनुसार स्वच्छता म्हणजे आपले शरीर, मन आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व गोष्टी स्वच्छ असायला पाहिजेत. त्याची सवय प्रत्येकाला असायला हवी. तरच आपले शहर स्वच्छ व सुंदर होईल. आरोग्य चांगले राहील. आपले घर, परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. पण काही मोजके नागरिक सोडले तर किती जण ही जबाबदारी पार पाडतात? याचा प्रत्येकाने विचार करण्याची वेळ आली आहे.
साफसफाई करण्याची महापालिकेची जबाबदारी आहेच. सार्वजनिक ठिकाणी कचरा पडून दिसला की, सफाई कर्मचारी येत नसल्याची महापालिकेकडे तक्रार केली जाते. ती केलीच पाहिजे, पण आपल्या घरातील कचरा कचरागाडीत टाकतो का? घराचा परिसर स्वच्छ ठेवतो का याचाही विचार करण्याची वेळ आली आहे. परिसर स्वच्छ असेल तर आरोग्य चांगले राहील, अन्यथा दुर्गंधी व घाणीमुळे विविध आजारांना सामोरे जावे लागेल.
अनेक जण शिल्लक अन्न घराच्या आजूबाजूला टाकतात. काही तर शेजाऱ्यांच्या ओट्यावर टाकतात. घरातील कचरा, कचरागाडीत न टाकता उघड्यावर फेकतात. यामुळे कचरा फेकणाऱ्यांसोबतच परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. बहुमजली इमारतीत वरच्या माळ्यावरील महिला खिडकीतून कचरा खाली फेकतात. यामुळे खाली राहणाऱ्यांना त्रास होतो. अनेकदा तक्रार करूनही सवयी बदललेल्या जात नाही. परंतु यामुळे शेजाऱ्यांसोबतच कचरा फेकणाऱ्यांच्या आरोग्याला तितकाच धोका असतो. मात्र कचरा फेकणाऱ्यांना याचा विसर पडला आहे.

तक्रार करा, दंड होईल
सार्वजनिक ठिकाणी, घराच्या आजूबाजूला अनेकजण कचरा टाकतात. घरातील शिळे अन्न आजूबाजूला टाकले जाते. यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. असा प्रकार निदर्शनास आल्यास झोन कार्यालयाकडे तक्रार करा, दोषींवर दंडात्मक कारवाई केली जाईल. ओला आणि सुका कचरा विलग करूच द्यावा, हाऊ सिंग सोसायट्यांनी ओल्या कचºयाची विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. त्यांनी यापासून कंपोस्ट खत तयार करावे. शहर स्वच्छतेसाठी तसेच आरोग्यासाठी नागरिकांनी घर व परिसर स्वच्छ ठेवावा. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये.
- डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता)

ओला व सुका कचरा वेगळा करा
ओला आणि सुका कचरा विलग करून कचरागाडीत टाकला तर त्यावर प्रक्रिया करणे सोयीचे जाते. ओला आणि सुक्या कचऱ्याचे घरच्या घरीच योग्य व्यवस्थापन झाले तर कचऱ्याचे ढीगच्या ढीग डम्पिंगला जाणार नाहीत. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही.
हे करता येणे शक्य आहे...
घरच्या घरी ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती सहज शक्य आहे. मोठ्या सोसायट्यांमध्ये आयताकृती सिमेंटचे खड्डे तयार करून त्यात सोसायटीतील ओला कचरा दिवसांप्रमाणे त्यात टाका, त्यापासून चांगले खत तयार होईल.

मास्क कुठेही टाकू नका
संसर्ग होऊ नये यासाठी नागरिक मास्क वापरत आहेत. वापरलेल्या मास्कची योग्यप्रकारे विल्हेवाट लावली पाहिजे. वापरलेले मास्क कागदात गुंडाळून कचरागाडीत टाका, तसेच हॉस्पिटलमध्ये वापरण्यात आलेले मास्क बायोमेडिकल वेस्टमध्येच टाकले जावे, असे आवाहन मनपाने केले आहे.

बाजारातील कचरापेट्या नागरिकांसाठी
बाजार भागात कचरा होऊ नये यासाठी कचरापेट्या लावण्यात आलेल्या आहेत. मात्र यात दुकानदार कचरा टाकतात. या पेट्या नागरिकांच्या सुविधेसाठी लावण्यात आलेल्या आहेत. दुकानदारांनी कचरा संकलन करून कचरा गाडीत टाकावयाचा आहे.

Web Title: If the city is clean, your health is good

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.