कन्सेप्ट स्पष्ट असल्यास यश निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 12:55 AM2017-09-03T00:55:43+5:302017-09-03T00:56:02+5:30
लोकमत कॅम्पस क्लब, युवा नेक्स्ट व करिअर कॅम्पस प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बँकिंग व स्टाफ सिलेक्शन परीक्षेच्या तयारीचे मार्गदर्शन करण्यासाठी शनिवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकमत कॅम्पस क्लब, युवा नेक्स्ट व करिअर कॅम्पस प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बँकिंग व स्टाफ सिलेक्शन परीक्षेच्या तयारीचे मार्गदर्शन करण्यासाठी शनिवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. रामगोपाल माहेश्वरी भवन, झाशी राणी चौक येथे आयोजित कार्यशाळेत विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महाराष्टÑातील अनुभवी आणि प्रसिद्ध मार्गदर्शक सुशांत भगत यांनी बारावी उत्तीर्ण, पदवीधर तसेच अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना शासकीय क्षेत्रात नोकरी आणि करिअरबाबत माहिती दिली. बँकिंगच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भरती आणि नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. अशावेळी या क्षेत्रात संधी मिळविण्यासाठी बँकिंग आणि स्टाफ सिलेक्शन परीक्षांची तयारी महत्त्वाची आहे. कन्सेप्ट स्पष्ट असतील तर यश मिळविण्यास वेळ लागत नाही, असे मार्गदर्शन भगत यांनी केले. परीक्षेत येणारे प्रश्न कसे सोडवावेत आणि कमी वेळात अधिकाधिक तयारी कशी करावी, याबाबत त्यांनी इत्थंभूत माहिती दिली.
‘आयबीपीएस पीओ’च्या नवीन पॅटर्नबाबत माहिती देत त्यांनी प्राथमिक परीक्षा व मुख्य परीक्षेची निर्धारित वेळ आणि गुण याबाबत माहिती दिली. बºयाच काळापासून तयारी करणाºया विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अशा विद्यार्थ्यांना आत्ममंथन करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. यश न मिळण्याचे नेमके कारण व कुठे चूक होत आहे, याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा, अशी सूचना त्यांनी दिली. योग्य दिशेने प्रयत्न केल्यास अवघ्या पाच ते सहा महिन्याच्या तयारीत यशस्वी होता येते, असा विश्वास भगत यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी कार्यशाळेत करिअर कॅम्पस प्रशिक्षण संस्थेचे योगिता नवघरे व अमित तितरमारे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी साधला संवाद
कार्यशाळेच्या अंतिम टप्प्यात विद्यार्थी व पालकांनी सुशांत भगत यांच्याशी संवाद साधला. स्पर्धा परीक्षा व त्याअंतर्गत तयारीबाबत अनेक शंका विद्यार्थी व पालकांनी मांडल्या. भगत यांनीही प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत विद्यार्थ्यांचे समाधान केले. कार्यशाळेदरम्यान करिअर कॅम्पसतर्फे बँकिंग परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक पुस्तकावर ५० टक्के सूट देण्यात आली.