... जणू इथे कोरोना अजिबात शिरलेला नाही.. पहाटेपर्यंत सुरू असतात पार्ट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 10:25 AM2020-07-06T10:25:07+5:302020-07-06T10:27:38+5:30
सूर्यास्त होताच महामार्गावरील ढाब्यांमध्ये झगमगाट सुरू होतो. एक एक करत चारचाक्या, दुचाक्या थांबायला लागतात. जेवणाचे ऑर्डर देऊन बिनधास्त दारूच्या बाटल्या फोडल्या जातात आणि संबंधित ग्राहक पेंगत नाही तोवर हा झगमगाट सुरू असतो.
प्रवीण खापरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे रेस्टॉरंट्स, ढाबे बंद असताना महामार्गावर मात्र सर्रासपणे प्रशासनाच्या डोळ्यासमोर नियमांचे उल्लंघन करण्यात येत आहे. महामार्गावरील ढाबे रात्रीच्या अंध:कारात बिनधास्त सुरू आहेत. रात्री ८ वाजतापासून सुरू होणारी गर्दी दुसऱ्या दिवसाचा सूर्योदय होईपर्यंत कायम असते. ‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मधून हा प्रकार उघड झाला आहे.
रेस्टॉरंट, ढाबे यांना पार्सल डिलिव्हरी करिताच परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ढाबे संचालकांनी सरकारच्या या सूचनांना ‘अनफॉलो’ करत मनमानी कारभार करण्यास सुरुवात केली आहे. सूर्यास्त होताच महामार्गावरील ढाब्यांमध्ये झगमगाट सुरू होतो. एक एक करत चारचाक्या, दुचाक्या थांबायला लागतात. जेवणाचे ऑर्डर देऊन बिनधास्त दारूच्या बाटल्या फोडल्या जातात आणि संबंधित ग्राहक पेंगत नाही तोवर हा झगमगाट सुरू असतो. पहाटे ५ वाजतापर्यंत हा झगमगाट, जेवणाचे ऑर्डर्स आणि चिअर्सचा आवाज अवैध मार्गाने गुंजत असतो.
असे केले ‘स्टिंग ऑपरेशन’
गेल्या आठवड्याभरापासून आऊटर रिंगरोड, नागपूर-जबलपूर महामार्गावरील ढाब्यांवर झगमगाट सुरू असल्याची माहिती मिळताच ‘लोकमत’च्या चमूने टेहळणी सुरू केली. शुक्रवारी आणि शनिवारच्या रात्री याच महामार्गावरील ग्रीन व्हॅली हायवे रेस्टॉरंट अॅन्ड ढाबा, त्रिमूर्ती ढाबा, हिंदुस्थान ढाबा, शेरे-ए-पंजाब सरदारजी का ढाबा येथे ग्राहक म्हणून भेट देण्यात आली. तेथील वेटर्सशी चर्चा केल्यानंतर सर्व सरकारी यंत्रणांना सेट करून हे ढाबे सुरू असल्याचे उघडकीस आले. रात्री २ वाजतापर्यंत थांबल्यानंतरही ग्राहकांचा ओघ सुरूच होता. सकाळी ५ वाजतापर्यंत हे ढाबे सुरू असतात, ही माहितीही यावेळी प्राप्त झाली. अनेक ग्राहक चक्क पत्नी, मुले यांच्यासोबत रात्री १२ वाजतापर्यंत ढाब्यांवर पार्ट्या उडवत असल्याचे दिसत होते. केवळ मित्र मंडळीच नव्हे तर कौटुंबिक पार्ट्याही ढाब्यांवर रंगत आहेत.
पोलिसांकडून सोयीस्कर दुर्लक्ष
महामार्गावर सातत्याने पोलिसांची पेट्रोलिंग व्हॅन टेहळणी करत असते. मात्र, या दोन दिवसात एकही व्हॅन या भागात भटकलेली नाही. शिवाय ढाबे सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून येत असतानादेखील कुठलीही कारवाई झालेली नाही.
दारूचे दाम दुप्पट
संध्याकाळी ५ वाजतापर्यंतच वाईन शॉप सुरू ठेवण्याची परवानगी आहे. शिवाय, बीअर बारला केवळ पार्सल सुविधा सुरू ठेवण्याचे आदेश आहे. मद्यशौकिनांसाठी ढाब्यांवर मद्याचा प्रचंड मोठा साठा करण्यात आला आहे. पोलिसांची कारवाई होऊ नये यासाठी एका ढाब्यावर हा साठा जवळच एका खड्ड्यात पुरुन ठेवण्यात आला आहे, हे विशेष.
‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा फज्जा
‘सॅनिटायझर’ आणि ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ची व्यवस्था एकाही ढाब्यावर दिसून आली नाही. एवढेच नव्हे तर स्वयंपाकी आणि वेटर्स यांच्या डोक्याला कॅप नव्हती, हाताला मोजे नव्हते आणि तोंडाला मास्कही नव्हता. टेबल पुसणारे क्लॉथही एकच आणि तो सर्व टेबल्सवर फेरल्या जात होता. एकूणच कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावातही कुठलीच काळजी घेतली जात नव्हती, असे दिसून आले.