देशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 09:45 PM2018-12-15T21:45:56+5:302018-12-15T21:53:37+5:30
भारताचे हिंदूराष्ट्र व्हावे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सुरुवातीपासूनच मानस आहे. यासाठीच त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. स्वातंत्र्यानंतर आपला देश धर्मनिरपेक्ष राहिला. म्हणूनच देशाचे पुढे तुकडे झाले नाहीत. मात्र जर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे देशाचे हिंदूराष्ट्र झाले तर भविष्यात फाळणीचा धोका आहे, असा इशारा ज्येष्ठ संपादक व राज्यसभा खासदार कुमार केतकर यांनी दिला. ‘लोकमत’तर्फे देण्यात येणाऱ्या पत्रपंडित पां.वा.गाडगीळ स्मृती आर्थिक-विकासात्मक लेखन आणि पत्रमहर्षी म. य. उपाख्य बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता स्पर्धा २०१५-१६ व १६-१७ चे शनिवारी वितरण करण्यात आले. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारताचे हिंदूराष्ट्र व्हावे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सुरुवातीपासूनच मानस आहे. यासाठीच त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. स्वातंत्र्यानंतर आपला देश धर्मनिरपेक्ष राहिला. म्हणूनच देशाचे पुढे तुकडे झाले नाहीत. मात्र जर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे देशाचे हिंदूराष्ट्र झाले तर भविष्यात फाळणीचा धोका आहे, असा इशारा ज्येष्ठ संपादक व राज्यसभा खासदार कुमार केतकर यांनी दिला. ‘लोकमत’तर्फे देण्यात येणाऱ्या पत्रपंडित पां.वा.गाडगीळ स्मृती आर्थिक-विकासात्मक लेखन आणि पत्रमहर्षी म. य. उपाख्य बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता स्पर्धा २०१५-१६ व १६-१७ चे शनिवारी वितरण करण्यात आले. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
‘नागपूर प्रेस क्लब’च्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख आमंत्रित म्हणून ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा हे उपस्थित होते. ‘लोकमत’चे संपादकद्वय सुरेश द्वादशीवार व दिलीप तिखिले हेदेखील मंचावर उपस्थित होते. महात्मा गांधी यांची हत्या फाळणीमुळे झालेली नाही तर संघाकडून १९३३ पासूनच याबाबत प्रयत्न सुरू होते. याचे मुख्य कारण गांधी यांची लोकप्रियता हेच होते. त्यांची लोकप्रियता हिंदूराष्ट्र संकल्पनेच्या आड येत होती. स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी यांनी अटीतटीच्या काळातदेखील देशाचे तुकडे होऊ दिले नाहीत. मात्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हिंदूराष्ट्राचाच अजेंडा राबविण्यात येत आहे. हे देशासमोरील खरे आव्हान आहे. हिंदूराष्ट्र म्हणून देशाची ओळख प्रस्थापित झाली तर काश्मीर, पंजाब तसेच ईशान्येकडील राज्यांचे धर्माच्या नावाखाली तुकडे पडण्याची शक्यता आहे. विकासाच्या गोंडस बुरख्याखाली हे प्रकार सुरू आहेत. त्यासाठीच बौद्धिक, सामाजिक व सांस्कृतिक भेद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. हा बुरखा योग्य वेळी फाडण्याची आवश्यकता आहे, असे केतकर म्हणाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांचा तसेच परीक्षक डॉ. प्रमोद मुनघाटे यांचा सन्मान करण्यात आला. दिलीप तिखिले यांनी आभार मानले.
भाजप-संघाला देश नेहरूमुक्त करायचा आहे
भाजप सरकारकडून व नेत्यांकडून देशाचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांना बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना नेहरूंना इतिहासातून पुसून टाकायचे आहे. वास्तविकता ही आहे की भाजप नेत्यांना नेहरूंची धास्ती वाटते. यातूनच नेहरूंचे आजदेखील किती महत्त्व आहे हे लक्षात येते. भाजपाला देश कॉंग्रेसमुक्त नव्हे तर नेहरूमुक्त करायचा आहे. मात्र नेहरू यांचे विचार कुणीही देशातून हटवू शकत नाही. नेहरूवाद लोकांपर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे झाले आहे, असे प्रतिपादन खा. कुमार केतकर यांनी केले.
मराठी भाषेचा गौरव का जपला जात नाही : दर्डा
यावेळी विजय दर्डा यांनी स्वागतपर भाषणात ‘लोकमत’चा प्रवास तसेच ज्येष्ठ संपादकांच्या नावांनी देण्यात येत असलेल्या या पुरस्कारांवर प्रकाश टाकला. मागील काही दिवसांपासून देशात भेदभाव निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. आपण महासत्तेची चर्चा करत असताना असे प्रयत्न देशासाठी योग्य नाहीत. देशात गरिबी, कुपोषण, शेतकरी आत्महत्या, पर्यावरण, शिक्षण यांच्याशी निगडित अनेक महत्त्वाचे प्रश्न आहे. मोठ्या उंचीचा पुतळा आवश्यक की देशातील लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे महत्त्वाचे,असा प्रश्न विजय दर्डा यांनी उपस्थित केला. आपल्या शिक्षण पद्धतीवरदेखील विचार झाला पाहिजे. मातृभाषेचा अभिमान असला पाहिजे. मात्र राज्यात मराठी शाळा बंद होत आहेत. मराठी मुलांना आपलीच भाषा येत नाही. मराठी भाषेचा गौरव का जपला जात नाही हा चिंतनाचा विषय आहे. वृत्तपत्रांच्या माध्यमातून ही चळवळ उभी झाली पाहिजे, असे दर्डा यावेळी म्हणाले. ‘लोकमत’ला कॉग्रेसचे मुखपत्र म्हटले जाते. मात्र हे जनतेचे मुखपत्र आहे. कॉंग्रेसचे विचार राष्ट्रीय एकात्मतेचे आहेत. म्हणून आम्ही त्या विचारांचा नेहमीच पुरस्कार केला आहे. ‘लोकमत’चे संस्थापक संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी बाबूजी उपाख्य जवाहरलाल दर्डा यांच्याकडून आम्हाला वृत्तपत्र धर्माची शिकवण मिळाली. आम्ही त्याच मार्गावर चालतो आहोत, असेदेखील त्यांनी सांगितले.
मानवी प्रतिष्ठेचे अवमूल्यन चिंताजनक : डहाके
मागील दोन ते तीन वर्षांत झालेल्या विविध हिंसक घटनांमुळे नागरिकांच्या संवेदना बधीर झाल्या आहेत की काय असाच प्रश्न पडतो. लोकांना दाबण्याचे सत्ताकारण होत आहे. सत्तेच्या आकांक्षेतून जे काही होत आहे त्यावर मंथन झाले पाहिजे. मानवी प्रतिष्ठेचे होत असलेले अवमूल्यन चिंताजनक आहे. संविधानकारांचा विश्वास आपण पायदळी तुडवतो आहे का, असा प्रश्न वसंत आबाजी डहाके यांनी उपस्थित केला. नेहरु, इंदिरा यांना पुसण्याचे किती प्रयत्न झाले तर काही ना काही तर नक्कीच शिल्लक राहील. देशातील सद्यस्थिती लक्षात घेता आपण संविधानाकडे वळले पाहिजे व सखोल अध्ययन केले पाहिजे, असेदेखील ते म्हणाले.
‘लोकमत’ जनतेचे वृत्तपत्र : द्वादशीवार
सुरेश द्वादशीवार यांनी प्रास्ताविकातून ‘लोकमत’च्या प्रवासावर भाष्य केले. ‘लोकमत’च्या संचालक मंडळाने संपादकांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. ‘लोकमत’ हे सर्वार्थाने जनतेचे वृत्तपत्र आहे. ‘लोकमत’ने नेहमीच जनतेच्या प्रश्नांना मंच दिला व तत्त्वांसाठी संघर्ष केला. वर्तमानपत्राची जनतेशी नाळ जुळली आहे. संपादकांच्या नावाने पुरस्कार देणारे देशातील ‘लोकमत’ हे पहिले वर्तमानपत्र आहे, असे द्वादशीवार यांनी सांगितले.
यांचा झाला गौरव
पां.वा.गाडगीळ आर्थिक-विकासात्मक लेखन स्पर्धा
क्रमांक २०१५-१६ २०१६-१७
प्रथम अॅड. कांतीलाल तातेड संजय झेंडे
द्वितीय मेघना ढोके वंदना धर्माधिकारी
तृतीय सुधीर फडके राजू नायक
बाबा दळवी शोधपत्रकारिता स्पर्धा
क्रमांक २०१५-१६ २०१६-१७
प्रथम सचिन राऊत अनिल गवई
द्वितीय संजय देशपांडे प्रताप महाडिक
तृतीय सचिन वाघमारे विश्वास पाटील