फडणवीस केंद्रात गेले तर बावनकुळेंचा नक्कीच विचार होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2022 04:42 PM2022-08-13T16:42:35+5:302022-08-13T16:47:36+5:30
Nagpur News भाजपचा प्रदेशाध्यक्ष झाल्यावर पुढे काय काय होऊ शकते, हे समोर दिसतच आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हणताच सभागृहात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा जयघोष सुरू झाला.
कमलेश वानखेडे
नागपूर : भाजपचा प्रदेशाध्यक्ष झाल्यावर पुढे काय काय होऊ शकते, हे समोर
दिसतच आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हणताच सभागृहात
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा जयघोष सुरू झाला. ‘आपण
मुख्यमंत्र्यांबाबत शुभेच्छा दिल्या नाहीत, नाहीतर पुन्हा मिडियावाले
गडकरी-फडणवीस आमने-सामने लावतील, अशी कोपरखळी मारत गडकरींनी बाजु
सावरण्याचा प्रयत्न केला. पण पुन्हा दुसऱ्याच क्षणाला समजा पुढे फडणवीस
मोठे झाले, केंद्रात गेले तर बावनकुळे यांचा नक्कीच विचार होऊ शकतो, असे
सांगून गडकरींनी अप्रत्यक्षपणे बावनकुळे हे देखील मुख्यमंत्रीपदाच्या
शर्यतीत असल्याचे संकेत दिले.
भाजपा प्रदेशाध्यपदी नियुक्ती झाल्यानिमित्त आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचा
सत्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या हस्ते शनिवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आला.
यावेळी खा. रामदास तडस, माजी खा. अजय संचेती, शहर अध्यक्ष आ. प्रवीण
दटके, आ. कृष्णा खोपडे, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांच्यासह विदर्भातून
आलेले पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, बावनकुळे यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने पक्षात मेहनत करून ही पदे प्राप्त केली.
प्रत्येक पक्षात दोन प्रकारचे कार्यकर्ते असतात. झोकून देऊन काम करणारे व
बोटावर मलम लावणारे कार्यकर्ते असतात. पण बावनकुळे हे झोकून देऊन काम
करणारे कार्यकर्ते आहेत. ऊर्जा खात्याचे मंत्री असताना त्यांनी चांगले
काम केले. शेतकर्यांच्या कृषी पंपाचा बॅकलॉग त्यांनी कमी केला.
नागपूरच्या अडचणीत असलेल्या योजना मंजूर करवून आणल्या. तिकीट मिळाले नाही
तरी पूर्ण ताकदीने पक्षासाठी त्यांनी काम केले. या परीक्षेत ते यशस्वी
झाले, याचाही आवर्जून उल्लेख त्यांनी केला.
मुलाला, पत्नीला तिकीट, हे धंदे बंद
- भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. येथे आमदाराच्या पोटातून आमदार,
मुख्यमंत्र्याच्या पोटातून मुख्यमंत्री निर्माण होत नाही. लहान
कार्यकर्त्याला मोठ्या पदावर जाण्याची संधी या पक्षातच मिळते.
येथे घराणेशाही नाही. त्यामुळे आता मला नाहीतर माझ्या मुलाला, पत्नीला
तिकीट द्या, हे धंदे बंद. पण जनता म्हणेल तर नक्की नक्की तिकीट मिळेल,
असेही गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.