नागपूरच्या बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात आग लागली तर ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 10:31 AM2018-05-09T10:31:37+5:302018-05-09T10:31:47+5:30

आशियातील सर्वात मोठ्या पंचतारांकित बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे (एमआयडीसी) देण्यात येणाऱ्या सोईसुविधा अपुऱ्या असल्याची बाब पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

If fire in Nagpur's Butibori industrial area ... | नागपूरच्या बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात आग लागली तर ...

नागपूरच्या बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात आग लागली तर ...

googlenewsNext
ठळक मुद्देअग्निशमन कार्यालयात आवश्यक सुविधांचा अभाव उद्योगांकडून वार्षिक ८५ लाखांचा अग्निशमन सेस

मोरेश्वर मानापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आशियातील सर्वात मोठ्या पंचतारांकित बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे (एमआयडीसी) देण्यात येणाऱ्या सोईसुविधा अपुऱ्या असल्याची बाब पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. सोमवारी तीन वर्षांपासून बंद असलेल्या कारखान्याला आग लागली आणि लगतच्या कारखान्यांमध्ये पसरली. एमआयडीसीचा आगीचा बंब उशिरा पोहोचला. त्यामुळे श्यामबाबा रिरोलिंग हा बंद कारखाना जळाला आणि लगतच्या तीन कारखान्यांना आगीची झळ पोहोचली. जर आगीचे स्वरुप उग्र असल्यास कारखान्यांचे काय होणार, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

एकाच अग्निशमन बंबाने सुरक्षा
एमआयडीसीच्या अग्निशमन कार्यालयातील सुविधांची माहिती घेतली असता स्थिती विदारक आहे. बुटीबोरी औद्योगिक क्षेत्र मोठे असून सध्या जवळपास ४५० पेक्षा जास्त लहानमोठे कारखाने सुरू आहेत. त्यापैकी अनेक कारखाने २४ तास सुरू असतात. एमआयडीसीचे अग्निशमन कार्यालय बुटीबोरी क्षेत्रात आहे. त्यांच्याकडे आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी १२ हजार लिटर क्षमतेचा एक बंब आहे. दुसरा ५ हजार लिटर क्षमतेचा बंब नादुरुस्त तर तिसरा स्क्रॅपमध्ये काढला आहे. आगीचे स्वरुप मोठे असल्यास एका बंबाने खरंच आग विझेल काय, हा गंभीर प्रश्न आहे. आग विझविताना बंब पाच मिनिटात रिक्त होतो. त्यात पुन्हा पाणी भरताना तास लागतो. अशा वेळी आग विझणार नाही आणि लगतचे कारखाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडतील. उन्हाळ्यात आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. दररोज दोन ते तीन कॉल कार्यालयाला येतात. एका बंबाच्या भरवशावर कारखान्यांची सुरक्षा होत आहे.

अखेर कारखान्यांचे बंब मदतीला
बुटीबोरी इंडस्ट्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप राऊत यांनी सांगितले की, वर्ष २००४ मध्ये परिसरातील एका मोठ्या कारखान्याला कामगारांनी आग लावली होती. त्यावेळी जवळपास २० बंब बाहेरून बोलावले होते. आगीवर नियंत्रण मिळविण्यास दिवस लागला होता. अशी घटना पुन्हा होऊ नये, अशी अपेक्षा आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्याठी तीन बंब कार्यालयात असणे आवश्यक आहे. वेळोप्रसंगी इंडोरामा आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे खासगी बंब मागवावे लागतात. महत्त्वपूर्ण सुरक्षा बाबीकडे एमआयडीसीचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

कार्यालयात अपुरे कर्मचारी
अग्निशमन कार्यालयात एमआयडीसीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यास कंजुषी केली आहे. मंजूर २८ ते ३० जणांच्या कर्मचाऱ्यांऐवजी १४ जणांची भरती केली आहे. त्यात एक फायर अधिकारी, दोन ड्रायव्हर आणि अन्य कर्मचारी आहेत. उन्हाळ्यात लग्नसराई किंवा महत्त्वाच्या कामामुळे एक ड्रायव्हर हमखास सुटीवर असतो. दोघांचा भार एकावर येऊन त्याला २४ तास ड्युटी करावी लागते. राऊत म्हणाले, सोमवारी श्यामबाबा रिरोलिंग कारखान्याला दुपारी २.४५ मिनिटांनी आग लागली. एमआयडीसीचा बंब ३.३० पर्यंतही पोहोचला नव्हता. अखेर इंडोरामाचे एचआर प्रमुख निशिकांत भुरे यांना फोन करून बंब मागविला. १० मिनिटात बंब घटनास्थळी पोहोचला आणि १५ मिनिटात आगीवर नियंत्रण मिळविले. कार्यालयाला तीन गाडीची गरज आहे. नवीन गाडीला एक वर्ष झाले आहे. अनेक कारखान्यांमध्ये तीन शिफ्टमध्ये काम सुरू असल्यामुळे किमान तीन बंब आणि ३० अधिकारी व कर्मचाऱ्यांची गरज आहे. बुटीबोरी इंडस्ट्रीज असोसिएशची आवश्यक सुविधा पुरविण्याची अनेक वर्षांपासून मागणी आहे. त्यानंतरही अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्याचे चित्र आहे. सुविधा नसल्यामुळे येथील कारखान्यांना कधीच आग लागू नये, असा टोला त्यांनी लगावला.

उपकरणे व मॅनपॉवरचा अभाव
एमआयडीसी दरवर्षी जवळपास ४५० कारखान्यांकडून ८५ लाख रुपयांचा अग्निशमन सेस गोळा करतो. त्यापैकी ५० ते ५५ लाख रुपये कार्यालय आणि कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होतात. उरलेल्या ३० लाख रुपयांत आवश्यक सुविधा पुरविण्यात एमआयडीसी अपयशी ठरली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तीन बंबांची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. आमच्याकडून गोळा केलेला पैसा आमच्यावर खर्च करीत नाहीत, हे एमआयडीसीचे अपयश आहे. आवश्यक सुविधा पुरवाव्यात.
नितीन लोणकर, अध्यक्ष,
बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन.


दिवसाला येतात किमान दोन कॉल
आग लागल्याचे दिवसाला किमान दोन कॉल कार्यालयात येतात. उपलब्ध सुविधेत आगीवर नियंत्रण मिळवितो. वेळप्रसंगी लगतच्या गावांनाही सेवा देतो. १२ हजार लिटरचा एक बंब कार्यरत आहे, तर दुसरा ५,५०० लिटरचा बंब नादुरुस्त आहे. पाण्याचे प्रेशर पाहून छोटी गाडी भरायला १५ मिनिटे तर मोठ्या गाडीला एक तास लागतो. एक वर्षापूर्वी या कार्यालयात बदली झाली आहे. तत्पर सेवा देत आहे
पुरुषोत्तम जाधव, फायर अधिकारी,
एमआयडीसी अग्निशमन विभाग.

 

Web Title: If fire in Nagpur's Butibori industrial area ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग