पहिल्या डोसचे प्रमाणपत्र न मिळाल्यास दुसरा कसा घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:07 AM2021-07-01T04:07:00+5:302021-07-01T04:07:00+5:30

नागपूर : कोरोनाचा दुसऱ्या लाटेत वैद्यकीय सोयींचे पितळ उघडे पडले असताना, संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी लसीकरणावर अधिकाधिक भर देणे ...

If the first dose is not certified, how will the second be taken? | पहिल्या डोसचे प्रमाणपत्र न मिळाल्यास दुसरा कसा घेणार?

पहिल्या डोसचे प्रमाणपत्र न मिळाल्यास दुसरा कसा घेणार?

Next

नागपूर : कोरोनाचा दुसऱ्या लाटेत वैद्यकीय सोयींचे पितळ उघडे पडले असताना, संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी लसीकरणावर अधिकाधिक भर देणे आवश्यक आहे. परंतु लसीच्या तुटवड्यामुळे यावर पाणी फेरले जात असल्याचे सध्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे लसीकरण केंद्रावरील सावळागोंधळ यामुळे अनेकांवर लसीकरणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. यात दुसरा डोस घेताना पहिल्या डोसचे प्रमाणपत्र मागण्यात येत असल्याने अनेकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

कोरोनाच्या गंभीर लक्षणाला दूर ठेवण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. याचे महत्त्व आता कळायला लागल्याने लसीकरणाकडे लोक वळू लागले आहेत. परंतु पहिला डोस घेताना ‘को-विन अ‍ॅप’वर योग्य पद्धतीने माहिती भरली जात नसल्याने, याचा फटका दुसरा डोस घेताना संबंधित लाभार्थ्यांना बसत आहे. कधी मोबाईल क्रमांक चुकलेला, कधी मोबाईल बिघडलेला तर कधी संकेतस्थळ, ओटीपीच्या मंदगतीमुळे समस्या वाढल्या आहेत. यात भर पडली ती प्रमाणपत्राची. दुसरी लस घेताना या प्रमाणपत्राचा अडथळा अनेकांना येत आहे. ऑनलाईन प्रमाणपत्र कसे काढायचे, मोबाईल क्रमांकावर ओटीपी कसा घ्यायचा, याची अनेकांना माहिती नाही. अनेकांना प्रमाणपत्र घेऊन दुसऱ्या डोसकरिता जायचे आहे, याचीही कल्पना नसल्याने लसीकरण केंद्रांवरून परत फिरण्याची वेळ येत आहे.

::कोट

- ज्येष्ठांना मोठी अडचण

प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाकडे स्मार्टफोन असेलच असे नाही. काहींना वयोमानानुसार दिसत नाही, ऐकायला येत नाही. मोबाईलचे फारसे ज्ञान नाही, अशा लोकांसाठी प्रमाणपत्राची प्रक्रिया किचकट आहे. साधी समजेल, अशी प्रक्रिया हवी.

- संजय चव्हाण, अजनी

:: कोट

- स्मार्ट मोबाईल नाही

मजूर, कामगारांकडे स्मार्ट मोबाईल राहत नाही. काहींनी पहिल्या डोसच्या वेळी मुलाचा मोबाईल नंबर दिलेला असतो. यामुळे प्रमाणपत्र कुठून मिळवावे, हा प्रश्न येतो. शासनाने यासाठी पुढाकार घ्यायला हवा.

- आदित्य पांडे, धरमपेठ

-प्रमाणपत्र नसलेल्यांनाही दुसरा डोस

कोरोना प्रतिबंधात लसीकरणाचे पहिले प्रमाणपत्र बंधनकारक असले तरी, ज्यांच्याकडे उपलब्ध नाही त्यांनी लसीकरण केंद्रातील कर्मचाऱ्याला आपले नाव, आधारकार्ड नंबर व मोबाईल क्रमांक सांगितला तरी ‘को-विन अ‍ॅपवर’ ते दिसून येते. प्रमाणपत्र नसलेल्यांनाही दुसरा डोस दिला जात आहे.

- डॉ. संजय चिलकर आरोग्य अधिकारी, मनपा

-पहिल्या डोसचे प्रमाणपत्र न मिळाल्यास,

मोबाईल क्रमांक चुकीचा नोंदल्यास किंवा अन्य कारणाने पहिल्या डोसचे प्रमाणपत्र न मिळाल्यास संबंधितांनी दुसरा डोस घेण्यासाठी मोबाईल, संगणकीय ज्ञान असलेल्या लोकांची मदत घ्यावी. याशिवाय लसीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांना त्यांनी अडचण सांगावी.

-पहिल्या डोसची नोंदणी करताना काळजी घ्या

पहिल्या डोसच्या नोंदणीची माहिती इतरांकडून भरून घेताना त्याची पडताळणी करणे विशेषत: नाव व मोबाईल नंबर बरोबर आहे का ते पाहावे. पहिल्या डोसनंतर आलेल्या लिंकवरून इंटरनेटचे ज्ञान असलेल्यांकडून प्रमाणपत्र घेण्यापुरती मदत घ्यावी किंवा मनपाच्या लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी.

१) शहरात आतापर्यंत झालेले लसीकरण -

पहिला डोस-६६८४९७

दोन्ही डोस-२१३०११

Web Title: If the first dose is not certified, how will the second be taken?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.