गांधी अडले असते तर फाळणी झाली नसती : इंद्रेशकुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 10:24 PM2018-06-30T22:24:19+5:302018-06-30T22:27:12+5:30
महात्मा गांधी झुकले म्हणून देशाचे तुकडे झाले. ते अडून राहिले असते तर देशाची फाळणी झाली नसती. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा त्या स्वातंत्र्य उत्सवात देशातील एकाही क्रांतिकारकांच्या कुटुंबाला सहभागी करून घेण्यात आले नाही. देशासाठी बलिदान देणाऱ्यांचा त्या उत्सवात सहभाग नव्हता. कारण देशभक्त स्वातंत्र्यासाठी लढले होते. विभाजनासाठी नाही. १९४७ मध्ये देशाचे अवैध विभाजन झाले. तेव्हापासून सीमेवर शांती नाही, अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेशकुमार यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महात्मा गांधी झुकले म्हणून देशाचे तुकडे झाले. ते अडून राहिले असते तर देशाची फाळणी झाली नसती. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा त्या स्वातंत्र्य उत्सवात देशातील एकाही क्रांतिकारकांच्या कुटुंबाला सहभागी करून घेण्यात आले नाही. देशासाठी बलिदान देणाऱ्यांचा त्या उत्सवात सहभाग नव्हता. कारण देशभक्त स्वातंत्र्यासाठी लढले होते. विभाजनासाठी नाही. १९४७ मध्ये देशाचे अवैध विभाजन झाले. तेव्हापासून सीमेवर शांती नाही, अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेशकुमार यांनी केली.
गोकुळपेठ येथील हेडगेवार ब्लड बँकेच्या सभागृहात ‘देशातील सध्याची स्थिती’ या विषयावर इंद्रेशकुमार यांनी मत मांडले. या वेळी भारत-तिबेट सहयोग मंचचे प्रा. विजय केवलरामानी, हेडगेवार ब्लड बँकेचे सचिव अशोक पत्की, अ. भा. मुस्लीम मंचचे विराग पाचपोर उपस्थित होते. यावेळी इंद्रेशकुमार म्हणाले, जम्मू काश्मीरमध्ये भाजपाने बलिदान दिले. देशाच्या सुरक्षेसाठी सैन्याला मोकळीक देऊन पाकिस्तानला एक ठोस संदेश दिला. आता भारताने पाकिस्तानला चार पर्याय दिले आहेत. कोणता पर्याय ठीक वाटतो हे त्याला ठरवायचे आहे. पण आपले सैन्य दाखवित असलेले शौर्य पाहता पुढील दहा वर्षात भारतीयांना लाहोर, रावळपिंडीतही घर, मालमत्ता खरेदी करण्याची संधी आहे, असा इशाराही इंद्रेशकुमार यांनी पाकिस्तानला दिला.
२०१४ नंतर एक नवा भारत जन्माला आला आहे. आपण ५५ वर्षे देश लुटणाºयांना संधी दिली. तर पुढील २० वर्षे देश घडविणाऱ्यांना संधी देऊ शकत नाही का, असा सवालही त्यांनी केला. अमेरिकेसारख्या देशाचे स्वत:चे चरित्र नाही व तो देश आम्हाला चारित्र्याचे प्रमाणपत्र वाटत फिरत आहे. भोगवादी मूल्य बाळगणारे आम्हाला नैतिकतेचे पाठ शिकवित आहेत. त्यांच्या प्रमाणपत्राची आम्हाला गरज नाही, असेही त्यांनी सुनावले.
आपल्यातील संवाद संपला आहे
एका धर्माचा दुसऱ्या धर्माशी संवाद संपला आहे. त्या त्या धर्मात अंतर्गत संवादही होताना दिसत नाही. जाती-जातींमध्येही संवाद होत नाही. जेथे संवादाचा अभाव असतो तेथे अशांती व मतभेद वाढतात. संवादहिनता किंवा संवादातील कट्टरता दिसून येते. आम्हाला दंगे, हिंसाचाराचा देश नको आहे. प्रेमाचा देश हवा आहे. त्यासाठी सर्वांनीच आपली जबाबजारी पार पाडणे आवश्यक आहे, असेही इंद्रेशकुमार म्हणाले.
हास्ययोगातून मनप्रसन्नतेचे धडे
इंद्रेशकुमार यांनी भाषणाच्या सुरुवातीला उपस्थितांकडून हास्ययोग करवून घेत मनप्रसन्नतेचे धडे दिले. यानंतर सर्व धर्मांचे मंत्र म्हणलायला लावत सर्वधर्मसमभाव जपण्याचे आवाहन केले.