तो अमेरिकन हेर तर नाही ?
By Admin | Published: May 22, 2017 01:59 AM2017-05-22T01:59:21+5:302017-05-22T01:59:21+5:30
व्हीसाची मुदत संपल्यानंतरही गेल्या साडे तीन वर्षांपासून नागपुरात लपून छपून वास्तव्य करणाऱ्या
जून २०१३ पासून नागपुरात : लपूनछपून वास्तव्य
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : व्हीसाची मुदत संपल्यानंतरही गेल्या साडे तीन वर्षांपासून नागपुरात लपून छपून वास्तव्य करणाऱ्या अमेरिकन नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याशूवा मेसियाक लॅबोविथ (वय ३५) असे त्याचे नाव आहे. तो अमेरिकन सैन्य दलाचा माजी सैनिक असल्याची प्राथमिक माहिती आहे. तो येथे नेमका कोणत्या उद्देशाने राहत होता, ते स्पष्ट न झाल्यामुळे याशूवा हेरगिरी तर करीत नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रश्नाने प्रशासनाची झोप उडवून दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, याशूवा विदेशी सफरीच्या नावाखाली २०१३ मध्ये भारतात आला. १० जून २०१३ ला तो नागपुरात आला. सामाजिक कार्याच्या नावाखाली धर्माचा प्रचार प्रसार करताना याशूवाने काही मिशनरीजच्या माध्यमातून एका हॉटेलमध्ये प्रारंभी मुक्काम केला. नंतर मात्र त्याने एक भाड्याचे घर बघितले. सामाजिक कार्याच्या नावाखाली सर्वत्र मुक्त संचार आणि मुक्त संवाद करतानाच तो दीपाली नामक तरुणीच्या संपर्कात आला. त्यानंतर या दोघांनी लग्न केले. पुढे हे दोघे दुसऱ्या ठिकाणी आणि नंतर तेथून बोरगावमधील गोकुल हाऊसिंग सोसायटीतील अल्पाईन मिडोज (फ्लॅट नं. ३०२) येथे वास्तव्याला आले. येथे हे दोघे आणि दीपालीची मैत्रीण परिसरातील नागरिकांच्या ओळखीचे आहे. ते काय कामधंदा करतात, ते कळायला मार्ग नाही. मात्र, त्यांची लाईफ स्टाईल आलिशान असल्याचे परिसरातील मंडळी सांगतात.
‘हेरगिरी’कडे अंगुलीनिर्देश
सध्या भारत-पाकिस्तानमध्ये कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणावरून वादळ उठले आहे. पाकिस्तानने जाधव यांच्यावर हेरगिरी करण्याचा आरोप लावला आहे. दुसरीकडे चीनने अमेरिकेच्या १२ गुप्तहेरांची हत्या केल्याचे वृत्त सर्वत्र पोहचल्याने ‘हेरगिरी’चा विषय जगभरात चर्चेला आला आहे. अशात अमेरिकन याशूवाचे नागपुरातील संशयास्पद वास्तव्य ‘हेरगिरी’कडे अंगुलीनिर्देश करणारे ठरले आहे. त्यामुळे शहर पोलीस त्याची कसून चौकशी करीत आहेत. याशूवा संबंधीची माहिती खालीलप्रमाणे आहे. पासपोर्ट क्रमांक ५०४७४४२२०, निवासी परवाना क्रमांक (आरसी नंबर) १६४/ १३ (दि. ३० १०. २०१३) , पारपत्र नूतनीकरण अथवा व्हीसा मुदत वाढविण्यासंबंधात कुठेही अर्ज केलेला नाही.
असा झाला खुलासा
४शहर पोलीस दलात उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचे नुकतेचे फेरबदल झाले. विशेष शाखेतही नीलेश भरणे हे नवीन उपायुक्त रुजू झाले. त्यांनी विशेष शाखेचा रेकॉर्ड अपडेट करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने सर्वांकडून माहिती संकलित करणे सुरू केले आहे. त्यातून नागपुरात विदेशी नागरिक किती आहे, त्याचीही माहिती त्यांनी विविध पोलीस ठाण्यातून मागितली. त्यात साडेतीन वर्षांपूर्वी नागपुरात आलेला याशूवा लॅबोविथचे नाव अधोरेखित झाले. तो सध्या काय करतो, कुठे राहतो, त्याचा पासपोर्ट, व्हीसाची मुदत वाढवून घेतली काय, असे प्रश्न उपस्थित झाल्याने विशेष शाखेकडून १९ मे रोजी गिट्टीखदान पोलिसांना एक पत्र मिळाले. त्यानुसार, हवालदार गजानन ठाकरे आणि संजय पांडे यांनी याशूवाची शोधाशोध सुरू केली. चौकशीत याशूवा गोकुल सोसायटीत राहत असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी शनिवारी त्याला गाठून त्याची विचारपूस केली. पुढे आलेल्या माहितीनंतर पोलीस दलच नव्हे तर अवघ्या प्रशासनातच खळबळ उडाली. याशूवालाच्या व्हीसाची मुदत कधीचीच संपली अन् त्याने त्याच्या पासपोर्टचेही नूतनीकरण केले नसल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन शनिवारी सायंकाळी गिट्टीखदान ठाण्यात आणले. त्याच्याविरुद्ध विदेशी नागरिक कायदा १९४६ कलम १४, अ,ब,क अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर अनेक अधिकारी ठाण्यात पोहचले. तेव्हापासून तो येथे लपून छपून का राहत होता, काय करीत होता, दीपालीची काय भूमिका आहे, त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस वेगवेगळ्या पद्धतीने चौकशी करीत आहेत.