होम क्वारंटाईन बाहेर निघाले तर गुन्हे दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 09:16 PM2020-03-27T21:16:04+5:302020-03-27T21:18:44+5:30
होम क्वारंटाईनमध्ये असलेले लोक बिनधास्तपणे घराबाहेर फिरत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार संबंधिताच्या कुटुंबासाठीच नव्हे तर नागरिकांसाठीही धोकादायक आहे. तेव्हा अशा लोकांविरुद्ध कडक कारवाईची गरज आहे. होम क्वारंटाईन असलेली मंडळी घराबाहेर निघाली तर गुन्हे दाखल करा, अशी मागणी पुढे आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून विदेशातून प्रवास करून आलेल्यांना ‘होम क्वारंटाईन’( घरीच एकटे ) राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशा लोकांना कुठल्याही परिस्थितीत घरातील एका खोलीत स्वत:ला एकटे करून घ्यायचे आहे. कुटुंबातील इतर सदस्यांच्या संपर्कात यायचे नाही. अशा लोकांवर प्रशासन व पोलीस विभागाचे लक्ष असल्याचा दावा केला जात आहे, परंतु वस्तुस्थिती वेगळीच आहे. होम क्वारंटाईनमध्ये असलेले लोक बिनधास्तपणे घराबाहेर फिरत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार संबंधिताच्या कुटुंबासाठीच नव्हे तर नागरिकांसाठीही धोकादायक आहे. तेव्हा अशा लोकांविरुद्ध कडक कारवाईची गरज आहे. होम क्वारंटाईन असलेली मंडळी घराबाहेर निघाली तर गुन्हे दाखल करा, अशी मागणी पुढे आली आहे.
खामला परिसरातील एका सोसायटीमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. अमेरिकेवरून एक व्यक्ती प्रवास करून आला आहे. त्याला प्रशासनाने होम क्वारंटाईन केले आहे. परंतु तो बुधवारी बिनधास्तपणे घराबाहेर फिरत असल्याचे परिसरातील लोकांना दिसून आले. लोकांनी यासंदर्भात मनपा, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलिसांशी संपर्क साधला. परंतु कुणीही दखल घेतली नाही. वारंवार फोन करूनही नियंत्रण कक्षातून त्यांना टाळाटाळीचे उत्तर दिले जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. अखेर आज शुक्रवारी पोलीस सतर्क झाले. ते होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तीच्या घरी पोहोचले. संबंधिताला घरीच राहण्याची सक्त ताकीद दिली. तसेच यानंतर हा व्यक्ती घराबाहेर दिसला तर त्याचे फोटो काढून पाठवा, अशा सूचनाही केल्या.
विशेष म्हणजे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावर अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. आतापर्यंत ९०१ लोकांना होम क्वारंटाईनमध्ये राहण्यास सांगण्यात आले आहे. लॉकडाऊन व कर्फ्यू लावण्यात आला आहे. नागरिकांना घरीच राहण्यास सांगितले आहे. पोलीस कठोर कारवाईसुद्धा करीत आहेत. अशा परिस्थितीत होम क्वारंटाईन व्यक्ती अशाप्रकारे बिनधास्त फिरतो आणि तक्रार केल्यानंतरही कारवाई होण्यास २४ तास लागत असतील तर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होतात. ज्या खामला परिसरातील ही घटना आहे त्याच परिसरात कोरोना पॉझिटिव्ह असलेले लोकही आढळून आले आहेत. तेव्हा ही बाब आणखीनच गंभीर ठरते.
... तर अशांची नावेच प्रसिद्ध करा
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, म्हणून शासन प्रशासन विविध उपाययोजना करीत आहेत. सध्या शहरात ९०१ लोकांना होम क्वॉरंटाईन आहेत. प्रशासनाने आतापर्यंत परिस्थिती चांगली नियंत्रणात ठेवली आहे. परंतु होम क्वॉरंटाईन असलेली मंडळी दिशा-निर्देशांचे पालन करीत नसतील. बिनधास्तपणे घराबाहेर फिरत असतील तर ते त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर सर्वांसाठीच धोकायदाय आहे. आतापर्यंत प्रशासनाने माणुसकी म्हणून अशा लोकांची ओळख पटू नये, याची काळजी घेतली. त्यांची नावे जाहीर केली नाही. परंतु हा प्रकार थांबला नाही, तर नागरिकांच्या हितासाठी प्रशासनाने अशा होम क्वॉरंटाईन लोकांच्या नावाची यादीच प्रसिद्ध करावी, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.