डास दिसल्यास नागपूर महापालिका करणार ५०० रुपयांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 10:16 AM2018-02-27T10:16:45+5:302018-02-27T10:16:52+5:30
डासांची उत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास आल्यास १०० ते ५०० रुपयापर्यंत दंड आकारला जाणार आहे. त्यानंतरही उपाययोजना न केल्यास दररोज २० ते २०० रुपये दंड आकारला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डेंग्यू, मलेरिया, चिकन गुनिया यासारख्या आजारांना आळा घालण्यासाठी महापालिकेने उपनियम तयार केले आहेत. त्यानुसार डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळून आल्यास संबंधित घरमालकांना नोटीस बजावून अशी स्थळे नष्ट करण्याची सूचना देण्यात येईल. त्यानंतरही डासांची उत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास आल्यास १०० ते ५०० रुपयापर्यंत दंड आकारला जाणार आहे. त्यानंतरही उपाययोजना न केल्यास दररोज २० ते २०० रुपये दंड आकारला जाणार आहे.
महाराष्ट्र महापालिका कॉर्पोरेशन कायदा कलम ४५८ (१९)अंतर्गत डास चावल्याने होणाऱ्या आजाराला आळा घालणे व नियंत्रणासाठी उपनियम तयार करण्यात आले आहेत. यात दंडाचीही तरतूद आहे. याबाबतचे उपनियम मंजुरीसाठी मंगळवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत ठेवण्यात आले आहेत. या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. उपनियमातील तरतुदीनुसार डास उत्पत्तीची स्थळे जसे, पाण्याची टाकी, लहान पूल, खड्डे, विहीर,, डबके, नाली आदी ठिकाणी पाणी साचणार नाही. घरापुढे वा परिसरात साचणारे पाणी वाहून जाईल, यासाठी तरतूद करण्यात आली आहे. जर एखादी व्यक्ती डासांच्या उत्पत्तीसाठी कारणीभूत असेल तर यासंदर्भात आयुक्तांकडे तक्रार करता येईल. तक्रारीनुसार संबंधिताला उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्याबाबत नोटीस बजावली जाईल. त्यानंतरही उपाययोजना न केल्यास दुसरी नोटीस बजावून दंड आकारला जाणार आहे.
विशेष म्हणजे घराचे अवैध बांधकाम असल्यास अशा कंत्राटदारालाही नोटीस बजावली जाणार आहे. याबाबतचे अधिकार महापालिकेला आहे. विहिरीत डास होत असल्यास संबंधितांना नोटीस बजावली जाणार आहे. नियमानुसार दंड आकारला जाणार आहे.