'आमच्या पोरांनी न्याय दिला, तर पोलिसांनी मध्ये यायचं नाही'; कल्याण प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 13:15 IST2024-12-20T13:13:10+5:302024-12-20T13:15:07+5:30
कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबाला परप्रांतीयांकडून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे, यावरुन आता राजकीय प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

'आमच्या पोरांनी न्याय दिला, तर पोलिसांनी मध्ये यायचं नाही'; कल्याण प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंचा इशारा
कल्याणमध्ये काल मराठी कुटुंबाला परप्रांतीयांकडून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणावरुन आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे संतापले आहेत.
मोठी बातमी! धनखड यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव नोटीस फेटाळली; उप सभापतींनी दिली ही कारणे...
कल्याणमध्ये अखिलेश शुक्ला या सरकारी अधिकाऱ्याने गुंडाकरवी मारहाण केली होती. 'तुम्ही मासे खाणारे मराठी माणसं घाण, भिकारी आहात, तुमचे मराठीपण बाहेर काढतो',असं म्हणत त्या अधिकाऱ्याने मराठी भाषिकांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. आमदार आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाई नाही केली तर आमच्या पोरांनी न्याय दिला तर पोलिसांनी मध्ये पडू नये असा इशारा दिला आहे.
आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, कल्याणमधील घटना संतापजनक आहे. मराठी अमराठी वाद संतापजनक आहे, याआधीचे आणि आताचे सरकार या वादाला प्रोत्साहन देत आहे का हे पाहणे गरजेचे आहे. गेल्या दोन वर्षापासून असे अनेक वाद झाले आहेत. राज्य कोणचही असो आमची मुंबई आमचे राज्य हे मराठी माणसाचेच आहे. अनेक लोक आमच्या राज्यात येतात, मिसळून राहतात. कोणालाही त्रास होत नव्हता. पण कालसारख जर कोण मस्ती दाखवत असेल तर तेव्हा आमच्या तरुणांनी त्यांना न्याय दिला तर न्याय कसा असतो हे दाखवलं तर पोलिसांनी मध्ये येऊ नये, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.
"कोण जिथे मराठी माणसाला मारलं आहे, तिथे त्या शुक्लाचे कोणी तोंड फोडलं तर पोलिसांनी मध्ये येऊ नये. तो अधिकारी जिथून आला आहे, त्या अधिकाऱ्याला तिथे पाठवावे, असंही ठाकरे म्हणाले. यापुढे जो कोणी व्हेज सोसायटी करायचा प्रयत्न करत असेल तर त्याची ओसी रद्द करावी, अशी मागणीही ठाकरे यांनी केली.
जर कोणी आपल्या मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. जर कोणी दादागीरी करत असेल तर त्या पोलिसांचा दंडूका काय आहे हे दाखवणे गरजेच आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. मला खात्री आहे जर हे मुख्यमंत्री महाराष्ट्र प्रेमी असतील तर आमच्या मागणीला मान देऊन तो कायदा आणतील, असंही ठाकरे म्हणाले.