रामटेकची जागा शिंदे गटाला दिली तर विरोधात लढणार, भाजपचे डी. मल्लिकार्जून रेड्डी यांचा उघड इशारा
By कमलेश वानखेडे | Published: June 24, 2023 06:05 PM2023-06-24T18:05:02+5:302023-06-24T18:09:25+5:30
जयस्वाल यांनी शासकीय बैठकांना उपस्थित राहणे समजू शकतो. पण भाजप पक्ष संघटनेच्या बैठकांना येण्याचा त्यांना अधिकार नाही, असेही रेड्डी म्हणाले.
नागपूर : २०१९ मध्ये भाजप- शिवसेनेची युती झाला असताना रामटेकची जागा भाजपला सुटली. आपण भाजपकडून निवडणूक लढविली. मात्र, आशीष जयस्वाल यांनी खनीकर्म महामंडळाचे अध्यक्ष असतानाही आपल्या विरोधात बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. त्यामुळे रामटेकची जागा यावेळी शिंदे गटाला गेली तर आपण विरोधात लढणार, असा उघड इशारा भाजपचे माजी आमदार डी. मल्लिकार्जून रेड्डी यांनी दिला आहे.
रेड्डी म्हणाले, २०१४ मध्ये भाजप व शिवसेना वेगवेगळी लढली. त्यावेळी मी भाजपकडून लढलो व आमदार झालो. २०१९ मध्ये युती झाली. युतीत ही जागा भाजपला सुटली. तरी जयस्वाल बंडखोरी करीत अपक्ष लढले. त्यांच्यामुळे भाजपचा पराभव झाला. निवडून आल्यानंतर जयस्वाल यांनी अडीच वर्षे महाविकास आघाडीला समर्थन दिले. शेवटी मंत्रीपद मिळाले नाही म्हणून ते शिंदे गटाकडे वळले. आता रामटेकच्या सर्व कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की ही जागा शिंदे गटाला देऊ नये. या जागेवर भाजपचाच कार्यकर्ता कमळ चिन्हावर लढावा. ही जागा शिंदे गटाला दिली तर त्या विरोधात आपण लढणार. भाजपच्या विरोधात लढणाऱ्याला परतफेड करावी लागेल, त्याचा हिशेब करावाच लागेल, असा इशाराही रेड्डी यांनी दिला.
भाजपच्या बैठकांना येऊ नये
- ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या निवडणुकीत जयस्वाल यांचे कार्यकर्ते भाजपच्या विरोधात लढतात. मग आमदारकीसाठी आम्ही त्यांना मदत कशी करावी, असा भाजप कार्यकर्त्यांचा सवाल आहे. जयस्वाल यांनी शासकीय बैठकांना उपस्थित राहणे समजू शकतो. पण भाजप पक्ष संघटनेच्या बैठकांना येण्याचा त्यांना अधिकार नाही, असेही रेड्डी म्हणाले.
कोणत्याही पक्षात जाणार नाही
- मी १९९६ पासून गडकरींच्या नेतृत्वात काम करीत आहे. मी भाजपमध्येच आहे. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, असेही रेड्डी यांनी स्पष्ट केले.