कोशियारी समितीच्या शिफारसी लागू केल्या नाहीत तर नोटावर मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 10:31 PM2018-12-15T22:31:03+5:302018-12-15T22:33:55+5:30
भगतसिंह कोशियारी कमिटीच्या शिफारशी लागू करण्यासह ३१ मे २०१७ चे बेकायदा परिपत्रक रद्द करण्याच्या मागणीसाठी ईपीएस-९५ निवृत्ती वेतनधारकांकडून गेल्या वर्षभरापासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांनी ‘नो कोशियारी नो व्होट’ असा नारा देत कोशियारी कमिटीच्या शिफारशी लागू केल्या नाही तर येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांऐवजी ‘नोटा’वर मतदार करण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भगतसिंह कोशियारी कमिटीच्या शिफारशी लागू करण्यासह ३१ मे २०१७ चे बेकायदा परिपत्रक रद्द करण्याच्या मागणीसाठी ईपीएस-९५ निवृत्ती वेतनधारकांकडून गेल्या वर्षभरापासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांनी ‘नो कोशियारी नो व्होट’ असा नारा देत कोशियारी कमिटीच्या शिफारशी लागू केल्या नाही तर येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांऐवजी ‘नोटा’वर मतदार करण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे.
नुकत्याच पाच राज्याच्या निवडणुका पार पडल्या. यातील तीन राज्यात भाजपाचा पराभव झाला असून, काँग्रेस सरकार स्थापन करीत आहे. या राज्यात मतदानावर नजर टाकली तर राजस्थानमध्ये १.३ टक्के व मध्य प्रदेशात १.४ टक्के मतदान नोटावर झाले आहे. मतदारांनी नोटावर मतदान केल्याने भाजपाचे उमेदवार पराभूत झाल्याचा दावा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी केला आहे. नोटाचा वापर करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने ईपीएस-९५ चे निवृत्तिधारक व त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे, असे ईपीएस-९५ चे संयोजक प्रकाश पाठक यांनी सांगितले. निवृत्ती वेतनधारकांच्या देशभरात झालेल्या सभांमध्ये कोशियारीच्या शिफारशी नाही तर मतदानही नाही, असा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, २०१४ मध्ये निवडणुकीच्या वेळी भाजपाच्या नेत्यांनी सत्तेवर आल्यास ९० दिवसांच्या आत कोशियारी कमिटीच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सरकार स्थापन होऊन साडेचार वर्षे लोटून गेली असताना आश्वासन पाळले गेले नाही. अनेक आंदोलने झाली, उपोषणही झालेत तरी सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप पाठक यांनी केला. त्यामुळे ईपीएस-९५ च्या निवृत्ती वेतनधारकांनी प्रत्येक निवडणुकीत नोटाचा उपयोग करण्याचे ठरविले असल्याचे त्यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत याचा प्रभाव पडल्याचा दावा त्यांनी केला.
सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाही तर येणाऱ्या २०१९ च्या निवडणुकीतही निवृत्त वेतनधारक नोटाचा वापर करतील व याचा मोठा प्रभाव निकालात दिसून येईल, असा इशारा पाठक यांनी दिला. येत्या १९ डिसेंबर रोजी दिल्ली येथे निवृत्त कर्मचाऱ्यांचे आंदोलन होणार असून, यावेळी ‘नो कोशियारी नो व्होट’ हा नारा गाजणार असल्याचे त्यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले.