आरक्षण नाकारल्यास सत्तेतून खाली खेचू
By admin | Published: December 9, 2015 03:32 AM2015-12-09T03:32:03+5:302015-12-09T03:32:03+5:30
भारतीय राज्य घटनेत धनगर समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जमातीचे आरक्षण निश्चित केले.
धनगर समाज संघर्ष समितीचा इशारा : येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष
नागपूर : भारतीय राज्य घटनेत धनगर समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जमातीचे आरक्षण निश्चित केले. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने मागील ६५ वर्षांपासून धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निवडणूक जाहीरनाम्यात धनगर समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा समाविष्ट केला. धनगर समाजाने भाजपाला भरघोस मतदान करून सत्तेत बसविले. परंतु वर्ष होऊनही भाजप सरकार आरक्षण देण्यास तयार नाही. त्यामुळे सरकार आरक्षण देण्यास टाळाटाळ करीत असेल तर सरकारला सत्तेतून खाली खेचू, असा इशारा धनगर समाज संघर्ष समितीत सहभागी नेत्यांनी दिला.
धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने हजारो धनगर समाजबांधवांचा मोर्चा विधानभवनावर काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी केले. हा मोर्चा टेकडी रोड मार्गावर पोलिसांनी अडवून धरला. त्यानंतर मोर्चात सहभागी मान्यवरांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी बोलताना डॉ. विकास महात्मे यांनी भाजप सरकारने लेखी दिलेले आश्वासन पाळले नसल्याचे सांगून आरक्षण नसल्यामुळे मागील ६० वर्षात धनगर समाजाची पिछेहाट झाली. समाजातील तरुण उच्चपदस्थ नोकऱ्यांवर जाऊ शकले नसल्याची खंत व्यक्त केली. सत्तेत बसलेल्या भाजप सरकारने धनगर समाजाची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी आमदार प्रकाश शेंडगे, मंगेश गुलवाडे, शशिकांत तरंगे, प्रा. विजय सोनजे, रामेश्वर पाटील आदी मान्यवरांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
सायंकाळी उशिरापर्यंत एकाही मंत्र्याने मोर्चाला भेट दिली नाही. मोर्चाला मुख्यमंत्र्यांनी सामोरे जाण्याचा आग्रह मोर्चात सहभागी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केला. मोर्चातील पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ कॅबिनेट मंत्र्यांच्या भेटीला गेले. त्यानंतर मंत्री महोदय मोर्चास्थळी भेट देणार असल्याचे आश्वासन त्यांना देण्यात आल्यामुळे रात्री उशिरापर्यंत धनगर समाजबांधव आंदोलन करीत होते.
मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन
दरम्यान, रात्री उशिरा जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि गृह राज्यमंत्री (ग्रामीण) राम शिंदे यांनी धनगर समाज बांधवांच्या मोर्चाला भेट दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मोबाईलवरून मोर्चेकऱ्यांशी संवाद साधून दिला. मुख्यमंत्र्यांनी आगामी एक वर्षाच्या कालावधीत धनगर समाजाला आरक्षण देण्यात येईल, असे आश्वासन दिले.