सातबारा कोरा होणार नसेल तर महाआघाडीशी संबंधाचा विचार करू : देवेंद्र भुयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 10:54 PM2019-12-21T22:54:48+5:302019-12-21T22:57:19+5:30
राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा, ही आमची मागणी आहे. या मागणीसाठीच आम्ही या सरकारच्या समर्थनात आहे. मात्र ती पूर्ण होणार नसेल तर महाविकास आघाडीशी आमचा काहीच संबंध राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनी अधिवेशनाच्या समाप्तीनंतर दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा, ही आमची मागणी आहे. या मागणीसाठीच आम्ही या सरकारच्या समर्थनात आहे. मात्र ती पूर्ण होणार नसेल तर महाविकास आघाडीशी आमचा काहीच संबंध राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनी अधिवेशनाच्या समाप्तीनंतर दिला.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, शिवसेनेच्या वचननाम्यात सातबारा कोरा करू, असा उल्लेख होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे वचनाला जागणारे होते. दुर्दैवाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कर्जमाफीच्या घोषणेत मात्र हे दिसले नाही. सातबारा कोरा होईल, असा शेतकऱ्यांना विश्वास होता. दुष्काळग्रस्त शेतकरी या अधिवेशनाकडे आस लावून बसला होता. मात्र तशी घोषणा न झाल्याने काल होते तसेच आजही शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण कायम आहे.
मुंबईत मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या सरकारने आपल्या घोषणेसंदर्भात धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा द्यावा, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना सूचना करणार आहे.
भुयार पुढे म्हणाले, १७ हजार कोटी रुपये मागणीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. ते प्राप्त झाले तर मदत निश्चित होईल, अशी आशा आहे. सातबारा कोरा व्हावा, ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. त्याचा विचार सरकारने करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.