समाजाचे अस्तित्व टिकवायचे असेल तर तीन अपत्ये हवीत :डॉ. मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 05:19 AM2024-12-02T05:19:15+5:302024-12-02T05:19:47+5:30
...तर तो समाज आपोआपच नष्ट होतो : सरसंघचालक
नागपूर : लोकसंख्याशास्त्रानुसार लोकसंख्या वाढीचा दर २.१ च्या खाली आला तर तो समाज आपोआप नष्ट होतो. त्याला कुणी संपवायची गरज नसते. म्हणून समाजाचे अस्तित्व टिकवायचे असेल तर त्यापेक्षा अधिक वेगाने लोकसंख्या वाढणे गरजेचे आहे. ०.१ माणूस तर जन्मत नाही. म्हणून किमान तीन अपत्य हवीत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी येथे केले.
कठाळे कुलसंमेलनाचे आयोजन रविवारी दीक्षाभूमीजवळील बी. आर. ए. मुंडले शाळेच्या प्लॅटिनम ज्युबली सभागृहात करण्यात आले. उद्घाटन सत्रात प्रमुख अतिथी म्हणून सरसंघचालक बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी अनिल कठाळे, संजय कठाळे, उदय कठाळे आणि शुभांगी कठाळे उपस्थित होते.
डॉ. भागवत म्हणाले, कुलसंमेलनाने धर्म व संस्कृती टिकते. कुलनीती चालली पाहिजे. त्यातून संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते. आपली संस्कृती टिकविली जाते. माणसाचा स्वभाव वाटणाऱ्यांचा असला पाहिजे. वाटणाऱ्यांचा मान मोठा असतो. तशीच समाजाची संस्कृती असते. महिलेचे महत्व आपल्या संस्कृतीत मातेचे असते. पाश्चात्य संस्कृतीत मात्र पत्नीचे असते. धन माणसाजवळ असावे, पण ते आवश्यकतेपेक्षा जास्त असू नये.
घरातील लहान गोष्टीतून संस्कृती जपायला हवी
मुलांना घरातच लागलेले वळण फार महत्त्वाचे असते. ते परंपरेने चालत आलेले असते. पाश्चात्य संस्कृतीमध्ये या गोष्टी वेगळ्या प्रकारे होत्या. पण आता त्याचा त्यांना विसर पडला आहे. याउलट आपल्याकडे संस्कृती अजूनही जपली जात आहे. घरातील लहान-लहान गोष्टीतून आपली संस्कृती जपली जाते. ही व्यवस्था आपल्याकडे आहे. कुटुंबापासून संस्कृती गाव आणि मग राज्यात जाते, असे सरसंघचालक म्हणाले.