नागपूरच्या विधानभवनवर दहशतवादी हल्ला झाला तर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:26 PM2017-11-22T23:26:19+5:302017-11-22T23:28:11+5:30
दहशतवादी विधानभवन परिसरात घुसले किंवा हल्ला केला तर त्यांच्याशी कसे निपटावे यासाठी पोलीस आणि इतर विभागांतर्फे बुधवारी मॉकड्रील करण्यात आली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : विधानभवन परिसरात बुधवारी दुपारपर्यंत शांतता पसरली होती. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर येथे दुरुस्तीचे काम सुरू होते आणि मार्गावरील रहदारीही सुरळीत सुरू होती. मात्र दुपारी ४ नंतर अचानक पोलिसांची गस्त वाढली. परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला आणि जवळच्या मार्गावरील वाहतूक इतरत्र वळविण्यात आली. विधानभवन परिसरात अंधार पसरला होता. पोलीस आणि अग्निशमन विभागाची वाहने तडकाफडकी विधानभवनात घुसल्याने लोकही अवाक झाले. अगदी धावपळीने सुरू असलेल्या या कारवाईमुळे नागरिकाना कळायला मार्ग नव्हता. दहशतवादी विधानभवनात घुसल्याची माहिती आल्याने लोकांच्या हृदयाची धडधड अधिकच वाढली होती. मात्र नंतर ही वास्तविकता नसून सुरक्षा विभागातर्फे केलेली मॉकड्रील असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
दहशतवादी हल्ल्याच्या दृष्टीने नागपूर शहरही संवेदनशील शहराच्या यादीत आले आहे. त्यामुळे दहशतवादी विधानभवन परिसरात घुसले किंवा हल्ला केला तर त्यांच्याशी कसे निपटावे यासाठी पोलीस आणि इतर विभागांतर्फे बुधवारी मॉकड्रील करण्यात आली. यासाठी आवश्यक साहित्य, मनुष्यबळ आणि वाहने पोलीस विभागाकडून पुरविण्यात आली. पोलिसांच्या सुचनेनुसार अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या पाठविण्यात आल्या. कर्मचाºयांनी तास-दीड तास ही कारवाई केली.
मीठा नीम परिसर रिकामा केला
मॉकड्रील अतिशय वास्तविक वाटावी म्हणून मीठा नीम दर्गाहचा परिसर रिकामा करण्यात आला. एरवी या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्यांची व भोजनदान करणाऱ्यांची गर्दी असते. मात्र मॉकड्रीलच्या काळात नागरिकांना प्रवेशास मनाई करण्यात आली. पार्किंगलाही मनाई केली गेली. विधानभवनाच्या प्रवेशद्वारासह इतर द्वार व आसपास परिसरात मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची तयारी सुरू असल्याचे लोकांना वाटले.
नागपूर संवेदनशील
संवेदनशीलतेच्या आधारावर काही शहरांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये नागपूरचाही समावेश आहे. विशेषत: संघ मुख्यालयामुळे दहशतवाद्यांच्या हिटलीस्टवर नागपूर असल्याचे बोलले जाते. त्यामुळे अशा अप्रिय घटनेशी निपटण्यासाठी एनएसजी जवानांकडून शहरात मॉकड्रील केली जात आहे. विधानभवनासह विमानतळ, वर्धा रोडवरील हॉटेल लॉ मेरिडीयन आदी ठिकाणी याआधी मॉकड्रील करण्यात आली आहे. पोलीस आणि अग्निशमन विभागाला ऐनवेळी या ठिकाणी पोहचण्याच्या सूचना दिल्या जातात. त्यांच्यासाठीही माहिती गुप्त ठेवण्यात येते.