देशाला वाचवायले असेल तर भाजपाला हरवावे लागेल, योगेंद्र यादव यांचे आवाहन
By मंगेश व्यवहारे | Published: October 3, 2023 05:11 PM2023-10-03T17:11:02+5:302023-10-03T17:11:23+5:30
२०२४ मध्ये इंडिया आघाडीच पर्याय
नागपूर : २०२४ ची निवडणूक ही सामन्य निवडणूक नाही. लोकशाही, संविधानाला संपविणाऱ्या आणि गणतंत्राचे तुकडे करणाऱ्या भाजप व आरएसएस विरोधातील महत्वाचा लढा आहे. २०२४ च्या निवडणुका हातातून गेल्यास पुढचे २५ वर्ष पर्याय राहणार नाही. भाजप आणि आरएसएसच्या जबड्यातून देशाला वाचवायचे असेल तर भाजपाला हरवावे लागेल, असे आवाहन प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. योगेंद्र यादव यांनी केले.
लोकशाही आणि संविधान बचाव आंदोलन मंच, आम्ही सारे भारतीय आणि धनवटे नॅशनल कॉलेज मास कम्युनिकेश विभागातर्फे मंगळवारी धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभागृहात ‘लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करणे प्रत्येक भारतीयांची जबाबदारी’ या विषयांवर आयोजित जाहीर व्याख्यानात योगेंद्र यादव बोलत होते. यावेळी त्यांनी विविध राजकीय पक्षाच्या इंडिया आघाडीत कितीही वाद असले तरी, तोच एकमेव पर्याय असल्याचे ते म्हणाले.
२०१४ मध्ये सत्तेत आलेल्या भाजप सरकारने लोकशाहीचीच हत्या, संविधानातील समाजवाद, धर्मनिरेपक्षाता, सामाजिक न्याय, एकात्मता संविण्याचे आणि गणतंत्रला तोडण्याचे काम केले आहे. चीन व पाकिस्तानपासून जेवढा धोका या देशाला नाही, तेवढा धोका भाजप व आरएसएसपासून असल्याचे ते म्हणाले. भारत मातेच्या दोन पुत्रांमध्ये दंगे पसरविण्याचे काम आरएसएस करीत आहे. मनिपूरमध्ये सरकारने सिव्हील वार सुरू केला आहे. त्यामुळे लोकतांत्रिक पद्धतीने या सरकारला हटविणे गरजेचे आहे. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत नागपूरकरांनो माणूस बघू नका, देशातील भाजपच्या सत्तेला आणि आरएसएस विचाराला पळविण्यासाठी इंडिया आघाडीच्या पाठीशी रहा, असे आवाहन त्यांनी केले.
या व्याख्यानाला अध्यक्ष म्हणून धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य ओ.एस. देशमुख, यांच्यासह अशोक सरस्वती, अरुण गाडे, प्रा. जावेद पाशा, अरुण लाटकर, अरुण वनकर, श्याम पांढरीपांडे, जम्मू आनंद, सुरेश अग्रवाल, देविदास घोडेस्वार, जगजितसिंग आदी उपस्थित होते.
- नागपूरला देश तोडणाऱ्या विचाराचा प्रतिकार करणारे म्हणून ओळखले पाहिजे
सद्या नागपूरातून एक विचार देशात पसरतोय. पण हा विचार देश तोडणारा आहे. हा विचार नागपूरची ओळख बनू देवू नका, नागपूर तर बहूजन आंदोलनाची भूमी आहे. नवीन उर्जा देणारी, क्रांतीची भूमी आहे. त्यामुळे नागपूरची ओळख देश तोडणाऱ्या विचाराचा प्रतिकार म्हणून झाली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.