सरकीचे दर वधारल्यास कापूस दराला मिळेल उभारी

By सुनील चरपे | Published: March 11, 2023 08:00 AM2023-03-11T08:00:00+5:302023-03-11T08:00:06+5:30

Nagpur News यंदा देशात कापसाचे उत्पादन घटले असून, आवक स्थिर राहिल्यास सरकीच्या दरात सुधारणा हाेऊन कापसाच्या दराला उभारी मिळणार असल्याचे मत बाजारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

If the price of sari is increased, the price of cotton will rise | सरकीचे दर वधारल्यास कापूस दराला मिळेल उभारी

सरकीचे दर वधारल्यास कापूस दराला मिळेल उभारी

googlenewsNext

सुनील चरपे

नागपूर : डिसेंबर-जानेवारीमध्ये असलेले प्रतिक्विंटल ३६०० ते ४२०० रुपये सरकीचे दर फेब्रुवारी-मार्चमध्ये प्रतिक्विंटल २८०० ते ३२०० रुपयांपर्यंत घसरले आहेत. याच काळात रुईचे ६१ हजार ते ६३ हजार रुपये प्रतिखंडीचे दर मात्र स्थिर राहिले आहेत. सरकीचे दर घसरल्याने कापसाचे दर प्रतिक्विंटल ७७०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. यंदा देशात कापसाचे उत्पादन घटले असून, आवक स्थिर राहिल्यास सरकीच्या दरात सुधारणा हाेऊन कापसाच्या दराला उभारी मिळणार असल्याचे मत बाजारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

यंदा कापसाला किमान ९ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असताना दर प्रतिक्विंटल ८५०० रुपयांच्या वर गेले नाही. दाेन महिन्यांत सरकीचे दर प्रतिक्विंटल ७०० ते १००० रुपयांनी घसरल्याने रुईचे दर स्थिर असूनही कापसाचे दर प्रतिक्विंटल ७७०० ते ८२०० रुपयांवर आले.

देशांतर्गत बाजारातील कापसाची आवकही घटली आहे. १ ऑक्टाेबर २०२१ ते १० मार्च २०२२ या काळात २ काेटी ९ लाख ४० हजार २०० गाठी कापूस बाजारात आला हाेता. १ ऑक्टाेबर २०२२ ते १० मार्च २०२३ या काळात १ काेटी ५९ लाख २८ हजार ९०० गाठी कापूस बाजारात आल्याने मागील हंगामाच्या तुलनेत चालू हंगामात ५० लाख ११ हजार ३०० गाठींनी कापसाची आवक घटल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

‘यूएसडीए’ने कापूस उत्पादनाचा अंदाज घटविला

सन २०२२-२३ या कापूस वर्षात भारतात ३६२ लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा पहिला अंदाज ‘यूएसडीए’ (युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ अमेरिका)ने व्यक्त केला हाेता. ‘यूएसडीए’ने फेब्रुवारीमध्ये ३२६.५८ लाख गाठींचा अंदाज व्यक्त केला हाेता. मार्चमध्ये या संस्थेने आधीच्या अंदाजित उत्पादनात १२.८८ लाख गाठींची कपात करीत भारतात ३१३.७० लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

 

जगासाेबत भारतात कापसाचे उत्पादन घटले आहे. शेतकऱ्यांनी कापसाची बाजारातील आवक स्थिर व कमी ठेवल्यास सरकीचे दर वाढले. त्याचा सकारात्मक परिणाम कापसाच्या दरवाढीवर हाेईल.

- गाेविंद वैराळे, माजी सरव्यवस्थापक,

कापूस पणन महासंघ

 

सरकी व ढेपेचा संबंध दूध उत्पादनाशी आहे. दूध उत्पादक सरकी व ढेपेला पर्याय म्हणून निकृष्ट प्रतीची व कमी दराची दूधकांडी वापरतात. त्यामुळे सरकीसह ढेपेची मागणी व वापर घटल्याने दाेन्हींचे दर घसरले आहेत. त्याचा परिणाम कापसाच्या दरावर झाला आहे.

- विजय निवल, माजी सदस्य,

काॅटन ॲडव्हायझरी बाेर्ड

...

Web Title: If the price of sari is increased, the price of cotton will rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस