ट्रान्सफॉर्मर जळाला तर महावितरणला कळवा, तातडीने बदलून मिळणार

By आनंद डेकाटे | Published: November 22, 2023 03:27 PM2023-11-22T15:27:39+5:302023-11-22T15:28:20+5:30

१८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल क्रमांकावर कळवा

If the transformer burns out, inform Mahavitran, it will be replaced immediately | ट्रान्सफॉर्मर जळाला तर महावितरणला कळवा, तातडीने बदलून मिळणार

ट्रान्सफॉर्मर जळाला तर महावितरणला कळवा, तातडीने बदलून मिळणार

नागपूर : ट्रान्सफॉर्मर जळाल्यास अथवा बिघडल्यास त्या जागी लवकरात लवकर दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी महावितरणने राज्यभर मोहीम सुरू केली आहे. पण ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर त्याची माहिती महावितरणकडे प्राप्त होण्यास विलंब लागत असल्याने स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर कळवावी किंवा मंडलस्तरावरील कार्यकारी अभियंत्यास कळवावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

गावातील ट्रान्सफॉर्मर जळाला तर विद्युत पुरवठा खंडित होऊन गावकऱ्यांची गैरसोय होते. जळालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या जागी दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यास विलंब होण्याची समस्या सोडविण्यासाठी महावितरणने सातत्याने प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी ट्रान्सफॉर्मर ऑईल तातडीने उपलब्ध करणे, दुरुस्त ट्रान्सफॉर्मरचा साठा तयार करणे असे विविध उपाय केले आहेत. ट्रान्सफॉर्मर बदलणे व दुरुस्त करणे याचा आढावा मुख्यालय स्तरावर दररोज घेण्यात येतो.

या मोहिमेला यश आले असून महावितरणला ट्रान्सफॉर्मर बिघडल्याची खबर मिळाल्यानंतर कमाल तीन दिवसात ट्रान्सफॉर्मर बदलण्यात येत आहे. तथापि, ट्रान्सफॉर्मर जळाला आहे, हेच उशीराने समजले तर प्रत्यक्षात वीज पुरवठा पुन्हा सुरू होण्यास अधिक विलंब लागत असल्याची समस्या जाणवत आहे. यावर मात करण्यासाठी वीज ग्राहकांनी महावितरणला मदत करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून ट्रान्सफॉर्मर जळाल्याची तक्रार करण्यासोबतच वीज ग्राहकांना स्थानिक नगापूर शहरातील वीज ग्राहकांनी मंडल स्तरावरील कार्यकारी अभियंता (प्रशासन) यांना ७८५०१००५२ या क्रमांकावर तर नागपूर ग्रामिण भागातील ग्राहकांनी मंडल स्तरावरील कार्यकारी अभियंता (प्रशासन) यांना ७८७५७६००१७ या क्रमांकावर माहिती देता येईल. त्यासोबत या दोन्ही क्रमांकावरील व्हॉट्सॲपवर जळालेल्या ट्रान्सफॉर्मरचा फोटो आणि ठिकाणाचा तपशील कळविता येईल.

जळालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या जागी दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसवून लवकरात लवकर वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्याच्या महावितरणच्या मोहीमेस वीज ग्राहकांनी सहकार्य करावे आणि ट्रान्सफॉर्मर बिघडल्याची खबर द्यावी, असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात येत आहे.

Web Title: If the transformer burns out, inform Mahavitran, it will be replaced immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.