नागपुरातील रामदासपेठ पुलाच्या कामास गती न दिल्यास नागरिकांचे तीव्र आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2023 09:27 PM2023-03-13T21:27:19+5:302023-03-13T21:28:05+5:30
Nagpur News रामदासपेठ येथील पुलाच्या कामाला गती न दिल्यास महापालिका मुख्यालयाकडे जाणारे रस्ते अडवून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आम आदमी पार्टीच्या वतीने केलेल्या आंदोलनादरम्यान देण्यात आला.
नागपूर : रामदासपेठ येथील विद्यापीठाच्या ग्रंथालयाजवळील पुलाचे काम अनेक दिवसांपासून रखडले आहे. यामुळे रामदासपेठ परिसरातील नागरिकांची गैरसोय होत असून, पुलाच्या कामाला गती न दिल्यास महापालिका मुख्यालयाकडे जाणारे रस्ते अडवून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आम आदमी पार्टीच्या वतीने केलेल्या आंदोलनादरम्यान देण्यात आला.
रामदासपेठ येथील नाग नदीवरील पुलाची सुरक्षा भिंत वाहून गेल्यामुळे महापालिकेने हा पूल पाडला. नवा पूल बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून ८ कोटींत हे काम भाजपचे भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे खासदार सुनील मेंढे यांचा मुलगा सिद्धार्थ व भाऊ अनिल मेंढे यांच्या सनी इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले. १८ महिन्यांत पुलाचे काम होणे अपेक्षित असताना हे काम कासवगतीने सुरू आहे. रामदासपेठकडून महाराजबागकडे जाणारा रस्ता या कामामुळे बंद आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचे पाहून आम आदमी पार्टीचे पश्चिम नागपूरचे संयोजक अभिजित झा यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी रामदासपेठ येथील जैन मंदिराजवळ निदर्शने केली. महापालिका प्रशासनाने याची उच्चरस्तरीय चौकशी करण्याची मागणी करून जोरदार नारेबाजी करीत आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्या रेटून धरल्या. आंदोलनात आम आदमी पार्टीचे नेते जगजित सिंग, शहर संयोजक कविता सिंघल, राजेश भोयर, संघटन मंत्री शंकर इंगोले, जॉय बांगडकर, महेश बावनकुळे, जावेद अहमद यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
.................