स्पर्धाच झाल्या नाहीत, तर मिळतील का सवलतीचे गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:07 AM2021-03-25T04:07:43+5:302021-03-25T04:07:43+5:30

मंगेश व्यवहारे नागपूर : अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा गुण विकसित व्हावेत, म्हणून दहावी आणि बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण ...

If there are no competitions, will you get discount points? | स्पर्धाच झाल्या नाहीत, तर मिळतील का सवलतीचे गुण

स्पर्धाच झाल्या नाहीत, तर मिळतील का सवलतीचे गुण

Next

मंगेश व्यवहारे

नागपूर : अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा गुण विकसित व्हावेत, म्हणून दहावी आणि बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्यात येतात. त्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयातून विभागीय शिक्षण मंडळाकडे खेळाडूंचा प्रस्ताव पाठविण्यात येतो. सवलतीचे गुण देताना अट एवढीच आहे की, दहावी आणि बारावीतील विद्यार्थी शैक्षणिक सत्रात जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी व्हायला हवा. पण २०२०-२१ या वर्षात शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजनच झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण मिळतील का? असा प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडला आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षेला प्रवीष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिल्हा, विभाग, राज्य क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य संपादन केलेल्या अथवा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण बोर्डाच्या परीक्षेत देण्यात येतात. पण क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्याकरिता जी नियमावली आहे, त्यात दहावीपूर्वी विद्यार्थ्याने खेळात प्रावीण्य मिळविले असले तरी, सवलतीचे गुण मिळण्याकरिता विद्यार्थ्याने दहाव्या अथवा बाराव्या वर्गात असताना क्रीडा प्रकारात सहभागी होणे आवश्यक आहे.

त्यासाठी मुख्याध्यापकांनी तसा प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे १ जानेवारी ते ५ एप्रिलपर्यंतच्या दरम्यान पाठवायचा असतो. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी त्याची छाननी करून ३० एप्रिलच्या आत विभागीय शिक्षण मंडळाकडे तो पाठवायचा असतो. नागपूर विभागीय शिक्षण मंडळाकडे यावर्षी अजून एकाही खेळाडू विद्यार्थ्याचा प्रस्ताव जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून आला नसल्याची माहिती आहे.

मार्च २०२० पासून राज्यात कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा झालेल्या नाही. यावर्षी जे खेळाडू दहावीत आहेत, त्यांनी यापूर्वी काही स्पर्धा गाजविल्या असतील, पण दहावीत असताना स्पर्धाच न झाल्याने त्यांना सवलतीच्या गुणांचा लाभ मिळणार नाही.

- कोरोनामुळे यावर्षी शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन झाले नाही. जे खेळाडू विद्यार्थी जिल्हा ते राष्ट्रीय स्तरावर विविध क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते, त्यांच्या वाढीव गुणांसंदर्भात अद्यापही सुधारित आदेश प्राप्त नसल्यामुळे शारीरिक शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक संभ्रमात आहेत व यामुळे असंख्य खेळाडू विद्यार्थी वाढीव गुणांच्या लाभापासून वंचित राहू शकतात.

- सुनील कोल्हे, शारीरिक शिक्षण शिक्षक

- आम्हाला पालकांकडून क्रीडा स्पर्धेच्या गुणांसंदर्भात विचारणा होत आहे. पण वरिष्ठांकडून त्यासंदर्भात कुठल्याही सूचना नाहीत. कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. पण त्या खेळाडूंचा यापूर्वी खेळलेल्या स्पर्धेच्याआधारे प्रस्ताव पाठविता येईल का? यासाठी आम्ही वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करीत आहोत.

- अविनाश पुंड, जिल्हा क्रीडा अधिकारी

- मागील शैक्षणिक वर्षापर्यंत क्रीडा सवलतीच्या वाढीव गुणास पात्र खेळाडू विद्यार्थ्यांना वाढीव गुण मिळायलाच हवेत. यावर्षी स्पर्धा न होण्यास विद्यार्थी जबाबदार नाहीत. शासनाने अशा असाधारण परिस्थितीत तरी शासननिर्णय २० डिसेंबर २०१८ परिशिष्ट १(३) मधील क्रीडा प्रकारामध्ये सहभागाची अट रद्द करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा.

- अनिल शिवणकर, संयोजक, भाजप शिक्षक आघाडी

Web Title: If there are no competitions, will you get discount points?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.