Pahalgam Terror Attack : दोन मिनिटांचा उशीर झाला असता तर...; रक्तरंजित हल्ल्यातून वाचले नागपुरकर कुटुंब

By योगेश पांडे | Updated: April 23, 2025 02:32 IST2025-04-23T02:32:08+5:302025-04-23T02:32:08+5:30

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात जीव वाचविताना महिलेचा पाय फ्रॅक्चर...

If there had been a two-minute delay A Nagpur family would have survived the bloody attack | Pahalgam Terror Attack : दोन मिनिटांचा उशीर झाला असता तर...; रक्तरंजित हल्ल्यातून वाचले नागपुरकर कुटुंब

Pahalgam Terror Attack : दोन मिनिटांचा उशीर झाला असता तर...; रक्तरंजित हल्ल्यातून वाचले नागपुरकर कुटुंब


नागपूर : मिनी स्वित्झर्लंड असलेल्या बैसरन व्हॅलीत निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घ्यायला गेलो होतो. मात्र अचानक गोळ्यांचा आवाज सुरू झाला अन किंकाळ्यांनी परिसर हादरून गेला. काय करावे, कुठे जावे याचाच कुठलाच अंदाज येत नव्हता. पती व मुलासोबत स्वत:ला वाचविण्यासाठी फक्त पहाडाच्या दिशेने धावायचे इतकेच कळत होते. जर बैसरन व्हॅलीच्या घटनास्थळावरून निघायला दोन मिनिटांचा उशीर झाला असता तर काहीही घडू शकले असते. शरीरातील वेदना अन डोळ्यातील भिती, संपूर्णपणे हादरलेल्या नागपुरकर सिमरन रुपचंदानी यांच्या शब्द अन शब्दांतून पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची दहशत स्पष्टपणे जाणवून येत होती. सिमरन या पती तिलक व मुलगा यांच्यासोबत पहलगामला गेल्या होत्या. अचानक झालेल्या या हल्ल्यात त्यांचा जीव थोडक्यात बचावला. मात्र त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.

जरीपटका येथील निवासी असलेले रुपचंदानी कुटुंब जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनाला गेले होते. मिनी स्विट्झर्लंड अशी ओळख असलेल्या बैसरन व्हॅलीत जाण्याचे प्लॅनिंग त्यांनी अगोदरपासूनच केले होते. तेथून परत जाण्यासाठी ते प्रवेशद्वारावर आले असता अचानक गोळीबार सुरू झाला. गोळीबार कुठून होत आहे, कोण करत आहे याचा कुठलाच अंदाज त्यांना येत नव्हता. त्यावेळी सर्व लोकांनी वाचण्यासाठी पहाडाकडे धाव घेतली. रुपचंदानी कुटुंबानेदेखील जीव मुठीत घेऊन धावायला सुरुवात केली. पहाडावर जाताना सिमरन यांचा पाय घसरला व त्या जखमी झाल्या. त्या अवस्थेत त्यांचे पती व मुलाने त्यांना सावरले व सुरक्षित ठिकाणी ते घेऊन गेले. जर त्यांनी समयसूचकता दाखवत पहाडाकडे धाव घेतली नसती तर त्यांनादेखील गोळ्या लागू शकल्या असत्या.

फक्त किंकाळ्या अन आक्रोश - 
गोळीबार सुरू झाल्यानंतर बराच वेळ तर केवळ आम्ही धावतच होतो. काही पर्यटकांचे नातेवाईक मागे सुटले, मात्र त्यांना परत घ्यायला जाणे म्हणजे मृत्यूच्या जबड्यात जाण्यासारखे होते. सर्वत्र केवळ किंकाळ्या अन आक्रोश ऐकू येत होता. आम्ही वाचू की नाही याची शाश्वती नव्हती. मात्र परमेश्वराच्या कृपेने आम्ही वाचलो अशी भावना सिमरन यांनी व्यक्त केली. सिमरन यांच्या पायाला दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहे.

कुठून गोळ्या आल्या कळलेच नाही 
घटनास्थळी चार ते पाच हजार पर्यटक होते. रुपचंदानी कुटुंबाने घोडा बुक करून पहलगाममध्ये पर्यटन केले. त्यानंतर ते बैसन व्हॅलीमध्ये पोहोचले. अचानक गोळीबार सुरू झाला, मात्र गोळ्या कुठून येत आहेत हे कळत नव्हते. एक्झिटचा दरवाजा चार फुटांचाच होता व पहाडाकडे जाताना पत्नी जखमी झाली. पत्नी व मुलगा सुरक्षित रहावा हेच माझ्या डोक्यात होते, अशी भावना सिमरन रुपचंदांनी यांच्या पतीने व्यक्त केली.

Web Title: If there had been a two-minute delay A Nagpur family would have survived the bloody attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.