हल्ले झाले तर अगोदर तक्रारच करू; पण कारवाई झाली नाही तर सोडणारही नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2022 10:28 PM2022-05-17T22:28:52+5:302022-05-17T22:29:18+5:30
Nagpur News आमचा लोकशाहीवर विश्वास असल्याने आम्ही असे पाऊल उचलू. जर कारवाई झाली नाही तर आम्हीदेखील सोडणार नाही, या भूमिकेचा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुनरुच्चार केला.
नागपूर : भाजप नेत्यांवर हल्ले वाढले असून, यापुढे असे प्रकार झाले तर आम्ही अगोदर तक्रारच करू. आमचा लोकशाहीवर विश्वास असल्याने आम्ही असे पाऊल उचलू. जर कारवाई झाली नाही तर आम्हीदेखील सोडणार नाही, या भूमिकेचा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुनरुच्चार केला. मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते बोलत होते.
भाजपच्या नेत्यांवर हल्ले करणे, पोलीस संरक्षणात आमच्या नेत्यांच्या सभेत आंदोलने करणे, आमच्या नेत्यांवर टोमॅटो फेकण्याचा प्रयत्न करणे हे सर्व आपले गृहमंत्री आहेत या तोऱ्यात होत आहे. आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत. त्यामुळे अगोदर तक्रार करू, असे फडणवीस म्हणाले. नवनीत राणांसोबत जे काही झाले तेव्हा सुप्रिया सुळे यांनी मौन राखले. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी अतिशय वाईट पद्धतीने वागणूक दिली तेव्हादेखील त्या गप्प का होत्या, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. संभाजीराजे छत्रपती हे स्वत:चा निर्णय घेण्यास सक्षम आहे, असे म्हणत त्यांच्या राज्यसभा उमेदवारीवर बोलण्याचे फडणवीस यांनी टाळले.