शाळा सोडल्याची टीसी नसेल, तर शाळेत प्रवेश देणे बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:09 AM2021-09-22T04:09:09+5:302021-09-22T04:09:09+5:30
नागपूर : राज्यभर शिक्षण शुल्कावरून सुरू असलेल्या वादामुळे व शाळाबाह्य विद्यार्थ्यांना प्रवेशित करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्र्यांनी टीसी नसेल, तरीही ...
नागपूर : राज्यभर शिक्षण शुल्कावरून सुरू असलेल्या वादामुळे व शाळाबाह्य विद्यार्थ्यांना प्रवेशित करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्र्यांनी टीसी नसेल, तरीही शाळांनी प्रवेश द्यावा, असे निर्देश दिले होते, पण त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. एकच विद्यार्थी दोन शाळांत प्रवेशित असल्याचे दिसत आहे.
अनेक शाळेत शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र न घेता, सरळ प्रवेश दिला जात असल्यामुळे पूर्वीच्या शाळेत तो विद्यार्थी पटावर व दाखल खारीजवर तसाच दिसून येतो. त्याचप्रमाणे, शासकीय ऑनलाइन पोर्टलवरही तो विद्यार्थी संबंधित जुन्या शाळेत दिसतो. शासकीय पोर्टलवर न्यू टॅबचा वापर करून विद्यार्थी नवीन शाळेत दाखविला जातो. त्यामुळे एकच विद्यार्थी दोन शाळांत दिसून येत आहे. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन(मेस्टा)ने शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र प्रवेशाच्या वेळी अनिवार्य करावे, अशी मागणी शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे. संघटनेच्या वतीने शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ.निशांत नारनवरे, प्रशांत सहारे, अरुणा किरणापुरे, मधुकर नारनवरे, कविता नाथ, रवींद्र शर्मा, अभिषेक नाथ व विजयश्री ठोंबरे आदी उपस्थित होते.