वेळ पडली तर फडणवीस यांचीही चौकशी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:07 AM2021-03-28T04:07:46+5:302021-03-28T04:07:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्रातील सत्ता गेल्यापासून भाजपचे राज्यातील नेते सैरभैर झाले आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्राला बदनाम करण्याचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रातील सत्ता गेल्यापासून भाजपचे राज्यातील नेते सैरभैर झाले आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम करीत असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यात आघाडीवर आहेत. फडणवीस हे बेछूट आणि बेलगाम आरोप करीत असून सातत्याने खोटे बोलत आहेत. अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना केली. केंद्रीय तपासणी यंत्रणांना हाताशी धरून ते महाराष्ट्राची बदनामी करीत आहेत. वेळ पडली तर सरकारने फडणवीसांचीही चौकशी करावी, अशी मागणीही पटोले यांनी केली.
कोणत्याही अधिकाऱ्याने कुठल्याही सरकारची कठपुतळी होऊन काम करू नये. काही अधिकारी पक्षाला समर्पित होऊन काम करतात हे लोकशाहीला घातक असल्याचे रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणावर बोलताना सांगितले. रश्मी शुक्ला यांची चौकशी सुरू झाली आहे. चौकशीत सत्य समोर येईलच, असे ते म्हणाले. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची निवृत्त पोलीस महासंचालक ज्युलियो रिबेरो यांनी चौकशी करावी, असे शरद पवार यांनी सुचवले आहे. आम्ही उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीची मागणी केली आहे. त्यातून सत्य बाहेर येईल, असे पटोले म्हणाले. रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असा रिपोर्ट मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिला. मात्र, हा रिपोर्ट मंत्र्यांनी तयार केला हा फडणवीसांचा आरोप बालिशपणाचा आहे, असेही पटोले म्हणाले.