विजय वडेट्टीवार भाजपात आले तर त्यांचे स्वागतच : चंद्रशेखर बावनकुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 08:43 PM2020-01-07T20:43:54+5:302020-01-07T20:45:41+5:30
राज्याचे मागासप्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग मंत्री विजय वडेट्टीवार यांना खातेवाटपादरम्यान दुय्यम खाती देण्यात आली असून त्यांच्यावर अन्यायच झाला आहे. ते जर भाजपात आले तर त्यांचे निश्चितच स्वागत करु या शब्दात राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्याचे मागासप्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग मंत्री विजय वडेट्टीवार यांना खातेवाटपादरम्यान दुय्यम खाती देण्यात आली असून त्यांच्यावर अन्यायच झाला आहे. ते जर भाजपात आले तर त्यांचे निश्चितच स्वागत करु या शब्दात राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. विजय वडेट्टीवार यांना मंत्रिमंडळ विस्तारात मिळालेल्या दुय्यम खात्यामुळे ते प्रचंड नाराज असून आठवड्याभरात ते धक्कादायक निर्णय घेणार असल्याचे काँग्रेसमध्ये बोलले जात आहे. याच अनुषंगाने बावनकुळे यांनी अप्रत्यक्षपणे वडेट्टीवार यांना भाजपात येण्याचे निमंत्रणच दिले आहे.
वडेट्टीवार यांच्याकडे महत्त्वाची खाती येतील अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात त्यांना मंत्रिमंडळ विस्तारात मागासप्रवर्ग, इतर मागासप्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास आणि भूकंप व पुनर्वसन ही खाती देण्यात आली आहेत. यामुळे वडेट्टीवारदेखील नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांत मतदान केल्यानंतर बावनकुळे यांनी त्यांची भावना मांडली. विजय वडेट्टीवार हे विधानसभेत विरोधी पक्षनेते होते व त्यांना मोठे खाते मिळेल अशी अपेक्षा होती. मागील वेळी विदर्भात मुख्यमंत्रिपदासह वित्त, ऊर्जा, कृषी यासारखी महत्त्वाची खाती होती. महाविकासआघाडीने वडेट्टीवार यांना मंत्रिपद दिले. परंतु त्यांच्याकडे विदर्भाच्या विकासाला चालना देणारी खाती नाहीत. यंदा विदर्भाला महत्त्वाची खाती मिळाली नाही. वडेट्टीवार यांना दुय्यम खाते मिळाल्याने विदर्भावर मोठा अन्याय झाला आहे. शिवाय त्यांना अशी खाती देऊन त्यांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वडेट्टीवार यांच्यावर खरोखरच अन्याय झाला आहे. कॉंग्रेस सोडायची की नाही याबाबत त्यांनीच निर्णय घ्यायचा आहे. परंतु ते जर भाजपात येणार असतील तर त्यांचे स्वागतच आहे, असे बावनकुळे म्हणाले.