जल, जमीन, जंगल हे अर्थव्यवस्थेचे मुख्य स्राेत व्हावेत - नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 11:12 AM2023-08-28T11:12:42+5:302023-08-28T11:13:26+5:30
तेव्हाच वाढेल आदिवासी भागाचा सुखांक
नागपूर : जल, जमीन, जंगल व जनावर हे भारतीय अर्थव्यवस्थेचे मुख्य स्रोत झाल्यास या देशातील आदिवासींचा, वनवासींचा हॅप्पी ह्युमन इंडेक्स (सुखांक) वाढेल, असे मत केंद्रीय भूपृष्ट व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थाद्वारे संचालित एकलव्य एकल विद्यालयाच्या शिक्षक व पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ते उपस्थित होते. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून इंडिया टीव्हीचे प्रमुख रजत शर्मा व प्रमुख अतिथी म्हणून श्री देवनाथ पीठ अंजनगाव सुर्जीचे पीठाधिश्वर जितेंद्रनाथ महाराज उपस्थित होते. गेल्या २७ वर्षांपासून लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेद्वारे आदिवासी लोकांसाठी एकलव्य एकल विद्यालयाच्या माध्यमातून शिक्षणाचे कार्य सुरू आहे. त्याचबरोबर येथील नागरिकांमध्ये संस्कृती, देशभक्ती व स्वच्छतेचे धडेदेखील दिले जात आहे. आता या भागातील लोकांच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर आहे. आदिवासी भागातील सामाजिक, आर्थिक विषमता दूर करण्याचा प्रयत्न एकलव्य एकल स्कूलच्या माध्यमातून सुरू असल्याचे गडकरी म्हणाले. या प्रसंगी मानकर स्मृती संस्थेचे अध्यक्ष अरुण लखाणी, सचिव राजीव हडप आदी उपस्थित होते.
- एकलव्य विद्यालय म्हणजे आदिवासींची प्रकाश प्रेरणा
शिक्षण आणि संस्कार हे महादान आहे. हे आपल्या देशाच्या मातीत रुजलेले आहे. त्यामुळेच गरिबांना मोठे होण्याची संधी मिळते. २७ वर्षांपासून एकलव्य एकल विद्यालयाच्या माध्यमातून गरीब, अभावग्रस्त, आदिवासी भागात शिक्षण देण्याचे कार्य केले जात आहे. त्यामुळे एकलव्य विद्यालय हे आदिवासींची प्रकाश प्रेरणा ठरत असल्याची भावना इंडिया टीव्हीचे प्रमुख रजत शर्मा यांनी यावेळी व्यक्त केली.