सत्तेत आलो तर राज्यात लव्ह जिहादविरोधात कायदा : प्रवीण दरेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 09:13 PM2020-11-25T21:13:02+5:302020-11-25T21:15:46+5:30
Praveen Darekar , law against love jihad in the state उत्तर प्रदेश सरकारने लव्ह जिहाद विरोधात कायदा आणण्याचा निर्णय घेतला आहे. तेथे भाजपचेच सरकार असून त्या कायद्याला आमचे पूर्णत: समर्थन आहेच. उत्तर प्रदेशमध्ये जी भूमिका आहे तीच महाराष्ट्रातदेखील कायम असेल. सत्तेत आल्यानंतर यात काहीच बदल होणार नाही व कायदा आणण्यासाठी पुढाकार घेऊ, असे प्रतिपादन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उत्तर प्रदेश सरकारने लव्ह जिहाद विरोधात कायदा आणण्याचा निर्णय घेतला आहे. तेथे भाजपचेच सरकार असून त्या कायद्याला आमचे पूर्णत: समर्थन आहेच. उत्तर प्रदेशमध्ये जी भूमिका आहे तीच महाराष्ट्रातदेखील कायम असेल. सत्तेत आल्यानंतर यात काहीच बदल होणार नाही व कायदा आणण्यासाठी पुढाकार घेऊ, असे प्रतिपादन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले. बुधवारी त्यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेमध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्याना आरक्षण न देण्याचे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. भाजपाने नेहमीच मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ बाजू मांडली. मात्र महाविकास आघाडी शासनाने आरक्षणाची बाब गंभीरतेने घेतली नाही. त्यांना मुळात मराठा समाजाला आरक्षण द्यायचे की नाही असाच प्रश्न उपस्थित होतो. अनेकदा तर न्यायालयात सरकारचे वकील तारखेला उपस्थित राहत नव्हते. राज्यात मराठा व ओबीसींमध्ये वाद निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी लावला. पदवीधर निवडणुकांच्या निकालानंतर सरकारविरोधात जनतेमध्ये किती नाराजी आहे हे स्पष्ट होईल. मराठा समाजातील तरुणच सरकारला खरा ‘ट्रेलर’ दाखवतील असेदेखील ते म्हणाले.
कॉंग्रेस सत्तेसाठी लाचार
महाविकास आघाडीमध्ये तीन प्रमुख पक्ष असले तरी प्रत्यक्षात राष्ट्रवादीचेच वर्चस्व असल्याचे चित्र आहे. त्यांनाच सर्वात जास्त फायदा होत असून कॉंग्रेसला अजिबात महत्त्व दिले जात नाही. त्यांच्या नेत्यांना सहकार्य केले जात नाही. कॉंग्रेसदेखील सत्तेच्या लाचारीपोटी मूग गिळून गप्प आहे, असे प्रतिपादन दरेकर यांनी केले.
राऊतांनी लगेच १०० जणांची यादी द्यावी
संजय राऊत यांच्याकडे भाजपच्या १०० नेत्यांची यादी असेल तर त्यांनी ईडीला जरूर द्यावी. आम्ही कुठल्याही चौकशीला घाबरत नाही, असे प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले. ‘ईडी’ ही स्वायत्त संस्था आहे. त्यांच्याकडे ठोस पुरावे असतील म्हणून त्यांनी प्रताप सरनाईकांची चौकशी सुरू केली आहे. त्यात भाजपचा काहीच संबंध नाही, असेदेखील त्यांनी सांगितले.