संविधानाच्या मार्गाने चालाल तर कधीच अपयशी होणार नाही - सरन्यायाधीश डॉ. डी.वाय. चंद्रचूड
By आनंद डेकाटे | Published: February 11, 2023 03:06 PM2023-02-11T15:06:24+5:302023-02-11T15:08:07+5:30
विधि विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ
नागपूर : संविधानाने सांगितलेल्या मार्गाने चालाल तर जीवनात कधीच अपयश येणार नाही, असे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश न्या. डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांनी येथे केले. महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ, नागपूरचा पहिला दीक्षांत समारंभात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.
वारंगा, बुटीबोरी येथे विधि विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरात आयोजित दीक्षांत समारंभाच्या वेळी देशाचे माजी सरन्यायाधीश व विद्यापीठाचे संस्थापक कुलपती न्या. शरद बोबडे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व राष्ट्रीय विधि विद्यापीठाचे कुलपती न्या. भूषण गवई, प्र-कुलपती व मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश न्या. संजय गंगापूरवाला, न्या. सुनील शुक्रे, न्या. अतुल चांदूरकर, न्या. अनिल किलोर, न्या. भारती डांगरे, इंडियन बार असोसिएशनचे अध्यक्ष मनन मिश्रा, एडओकेत जनरल वीरेंद्र सराफ तसेच विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विजेंदर कुमार व कुलसचिव डाॅ. आशिष दीक्षित उपस्थित होते.
२२० विध्यार्थ्यांना पदवी प्रदान, २५ विद्यार्थाना सुवर्णपदक
शैक्षणिक सत्र २०१६ पासून राष्ट्रीय विधि विद्यापीठाची बॅच सुरू झाली आहे. त्यानंतर कोरोनामुळे शैक्षणिक सत्रावर परिणाम झाला होता. त्यामुळे विधि विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ यावर्षी होत आहे. यामध्ये एल.एल.बी. पदवीच्या दोन बॅच आणि एल.एल.एम. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पाच बॅचेसच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यात पदवीच्या दोन बॅचमध्ये एल.एल.बी. झालेल्या १५८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यासह २०१६ ते २०२० पर्यंतच्या पाच बॅचमधील ५६ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर एल.एल.एम. पदवी प्रदान करण्यात आली. याशिवाय ६ विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवीने सन्मानित करण्यात आले. यावेळी शैक्षणिक सत्रात सर्वोत्तम ठरलेल्या विद्यार्थ्यांना २५ सुवर्णपदकांनी गौरविण्यात आले.