करोना बिरोना काही होणार आहे, असं माहित असतं तर आम्ही इथे आलोच कशाला असतो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 11:47 AM2020-04-08T11:47:07+5:302020-04-08T11:47:31+5:30

करोना बिरोना काही होणार आहे, असं माहित असतं तर आम्ही इथे आलोच कशाला असतो... इंडियन स्टोरमध्ये भेटलेल्या मराठी काकू मला सांगत होत्या.

If we know that something is going to happen to Corona, why are we here? | करोना बिरोना काही होणार आहे, असं माहित असतं तर आम्ही इथे आलोच कशाला असतो...

करोना बिरोना काही होणार आहे, असं माहित असतं तर आम्ही इथे आलोच कशाला असतो...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर:  करोना बिरोना काही होणार आहे, असं माहित असतं तर आम्ही इथे आलोच कशाला असतो... इंडियन स्टोरमध्ये भेटलेल्या मराठी काकू मला सांगत होत्या. इंडियन स्टोर यासाठी कि मी अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनाच्या ग्रीन्सबोरो या शहरात राहते. तर त्या काकू या सगळ्या परिस्थितीला वैतागलेल्या दिसत होत्या. त्या भेटीत आम्ही एकमेकांचे नंबर शेअर केले आणि दोघीही आपापलं सामान घेण्यात व्यस्त झालो.

घरी आल्यानंतर माझ्या डोक्यात विचार यायला लागले. त्या काकू इथे कधी आल्या असतील, त्यांचे कुठे फिरायला जायचे ठरले होते का?, किंवा त्या कुठे जाऊन आल्या आसतील का? असे प्रश्न माझ्या डोक्यात येत होते. त्या दिवशी त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा असल्याने, त्या त्यांच्या मुलाकडे काही दिवसासाठी आल्या आहे हे कळत होत. त्या दिवशीच्या त्यांच्या वावरण्यावरून त्या इथे पहिल्यांदाच आल्या आहेत हे जाणवत होतं. त्या काकूंचं वय ६० ते ६५ च्या दरम्यान असावं असं मला वाटलं. या वयात एखाद्या नवीन जागी जाऊन जुळवून घ्यायला किती त्रास होत असेल. केवळ जागाच नवीन नाही, तर हे सगळं ंजगच त्यांच्यासाठी निराळं आहे. इथले लोक, त्यांची भाषा हे सगळंच त्यांच्या करता नवीन आहे. त्यात भर म्हणजे करोनामुळे कुठे फिरायला जाणं तर सोडाच, पण घराबाहेर वॉकला जाणंसुद्धा बंद झालं आहे. त्यामुळे त्या घरात कंटाळल्या असतील असं मला वाटत होतं. शेवटी नराहावता दुसऱ्या दिवशी मी त्यांना फोन केला आणि त्यांना माझ्या मनात येतील ते प्रश्न विचारले, आमचा गप्पांचा कार्यक्रम बराच वेळ चालला.

त्यांच्याशी बोलताना मला कळले की त्या त्यांच्या मुलाकडे आल्या आहेत. त्यांचा मुलगा पाच सहा वर्षांपूर्वी अमेरिकेत शिक्षणासाठी आला होता. तो आता इथेच नोकरीला लागला. शिक्षण आणि नोकरी यामुळे त्याला भारतात जाणं जमलं नाही. त्यामुळे काका काकूच त्याला भेटायला आलेत. गेले सहा महिने झालेत ते इथे आहेत. काका काकूंची परत जाण्याची तयारी झालीच होती पण मधातच करोनाच सुरु झालं. करोनाची सुरवात अमेरिकेत झाली तेव्हा कोणत्याच प्रवासावर बंधनं नव्हती. परंतु प्रवासात इतर लोक आणि काका काकूंचा वय हे लक्षात घेता त्यांच्या मुलानी त्यांना पाठवलं नाही. त्यांच्या मुलाने घेतेलेला निर्णय खरंच योग्य आहे आणि कोणीही हाच निर्णय घेतला असता.

त्यावेळी विचार आला कि काकू आधीच इथल्या सगळ्या परिस्थितीला कंटाळल्या होत्या. भारतातल्यासारखी इथे चार मंदिरं असतील किंवा शेजारी पाजारी आपण जाऊन बोलू असं काही नसतं. काका काकू जेथे राहतात त्या सोसायटीत क्वचितच भारतीय असतील पण अजून त्यांची कोणाशी ओळख झाली नाही. त्यामुळे बोलायला कोणी नसल्याने ते अजूनच कंटाळले आहेत. बाहेर आता थंडी नसली तरी करोनामुळे कुठे जाणंदेखील बंद झालं आहे. करोनाचा प्रसार पाहता त्यांना अजून इथे चार पाच महिने तरी काढावे लागणार आहेत.

असे कितीतरी जणं इथे वेगवेगळ्या कारणांनी आले असतील आणि इथे अडकून पडले असतील. कोणी ट्रेनिंगला एक दोन महिन्यासाठीच आलं असेल, तर कोणी आपल्या मुला-मुली कडे काही दिवसांसाठी आलं असेल. त्यांचे भारतात काही प्लान्स ठरले असतील. कोणी आपल्या मुलाबाळांना सोडून आले असतील. त्या सर्व लोकांचे परत जाणे निदान चार पाच महिन्यासाठी तरी लांबले आहे. इथे काही कामानिमित्त आलेले लोक आणि त्यांची मायदेशी वाट पहाणाºया लोकांची काय अवस्था झाली असेल हे त्यांचं त्यांनाच ठाऊक. सध्या स्थितीत अमेरिकेत करोनाचे रुग्ण इथे खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. ही परिस्थिती आणखी किती दिवस राहील काही सांगता येणे कठीण आहे.

धनश्री पंडित-नानोटी
ग्रीन्सबोरो, नॉर्थ कॅरोलिना, अमेरिका

धनश्री या नागपूरच्या रहिवासी आहेत.

 

 

Web Title: If we know that something is going to happen to Corona, why are we here?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.