दहावी-बारावी परीक्षेत कॉपी कराल तर होणार गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2023 08:46 PM2023-02-14T20:46:48+5:302023-02-14T20:47:19+5:30
Nagpur News माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२३ होत आहे. या परीक्षांतील गैरप्रकार रोखण्यासाठी नागपूर शहर व जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबविण्यात येणार आहे.
नागपूर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२३ होत आहे. या परीक्षांतील गैरप्रकार रोखण्यासाठी नागपूर शहर व जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. परीक्षेत कॉपी पुरविण्यासारखे गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.
राज्यभरात पेपरफुटीच्या तसेच प्रश्नपत्रिका व्हाॅट्सॲप आणि इतर माध्यमातून व्हायरल होत असल्याने त्याला आळा घालण्यासाठी कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबविले जाणार असल्याचे विपीन ईटनकर यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, पोलिस उपअधीक्षक संजय पुरंदरे, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील ३५० केंद्रांवर या परीक्षा होणार आहेत. कॉपीमुक्त परीक्षा अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हास्तरावर दक्षता समिती गठित करण्यात आली आहे. तसेच तालुकास्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या गठित करण्यात येतील. यात बीडीओ, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश राहील. यासंदर्भात मुख्याध्यापक व संस्था चालकांना अवगत करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेत कंट्रोल रूम
प्रत्येक परीक्षा केंद्रावर दोन कर्मचाऱ्यांचे बैठे पथक नियुक्त करण्यात येणार आहे. या पथकांमध्ये महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश राहील. जिल्हा परिषद मुख्यालयात कंट्रोल रूम सुरू करण्यात येणार आहे. येथून परीक्षा केंद्र व भरारी पथक, बैठे पथक यांच्यावर नियंत्रण ठेवले जाणार आहे.
नागपुरात राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा
नागपुरातील चिटणवीस पार्क येथे १६ त १९ फेब्रुवारी दरम्यान कै. भाई नेरूरकर चषक राज्यस्तरीय खो- खो स्पर्धा होत आहे. यात राज्यातील ६८० खेळाडू सहभागी होतील. विजेत्यांना २४ लाखांची बक्षिसे दिली जातील. खेळाडूंची राहण्यासह जेवण व बसची व्यवस्था करण्यात आली आहे. आयोजनासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. स्पर्धा आयोजनात जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका व जिल्हा परिषद आदींचा सहभाग राहणार आहे.