रेल्वे रूळ ओलांडाल तर दाखल होईल गुन्हा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 07:30 AM2021-11-25T07:30:00+5:302021-11-25T07:30:02+5:30
Nagpur News रेल्वे रूळ ओलांडणे हा रेल्वे ॲक्टनुसार गुन्हा आहे. त्यात दंडात्मक आणि तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. तसेच बंद रेल्वे गेट ओलांडणे हा सुद्धा गुन्हा आहे.
दयानंद पाईकराव
नागपूर : रेल्वे रूळ ओलांडणे हा रेल्वे ॲक्टनुसार गुन्हा आहे. रेल्वेस्थानकावर असलेल्या फूट ओव्हरब्रीजचा वापर करूनच दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाणे सक्तीचे आहे. तरीसुद्धा कारवाईची चिंता न करता असंख्य प्रवासी थेट रेल्वे रूळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जातात. वेळ वाचविण्याच्या नादात अनेकांना आपला प्राणही गमवावा लागतो. त्यात रेल्वे सुरक्षा दलाने पकडल्यास दंडात्मक कारवाई किंवा वेळप्रसंगी तुरुंगातही जाण्याची पाळी येते.
-आतापर्यंत ३७६ जणांवर कारवाई
रेल्वे रूळ ओलांडणे हा रेल्वे ॲक्टनुसार गुन्हा आहे. रेल्वे सुरक्षा दल रेल्वे ॲक्ट १४७ नुसार अशा प्रवाशांविरुद्ध कारवाई करते. जानेवारी ते २४ नोव्हेंबर दरम्यान एकूण ३७६ प्रवाशांविरुद्ध रेल्वे रूळ ओलांडल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून रेल्वे सुरक्षा दलाने ८६ हजार ५०० रुपये दंडही वसूल केल्याची नोंद आहे.
दुचाकी होऊ शकते जप्त
-रेल्वे रूळ ओलांडणे हा रेल्वे ॲक्टनुसार गुन्हा आहे. त्यात दंडात्मक आणि तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. तसेच बंद रेल्वे गेट ओलांडणे हा सुद्धा गुन्हा आहे. बंद रेल्वे ओलांडल्यास रेल्वे ॲक्ट १५३, १५४ नुसार कारवाई करण्यात त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. तसेच त्यांना ५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा आणि दुचाकी जप्त करण्याचीदेखील शिक्षा होऊ शकते. त्यामुळे रेल्वे रूळ तसेच रेल्वे गेट न ओलांडण्याचे आवाहन रेल्वे सुरक्षा दलाने केले आहे.
रेल्वे रूळ ओलांडू नका
‘एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी रेल्वेस्थानकावर फूट ओव्हरब्रीजची व्यवस्था असते. परंतु वेळेची बचत करण्यासाठी काही प्रवासी थेट रेल्वे रूळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जातात. अशा प्रवाशांवर दंडात्मक कारवाई आणि तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे रेल्वे रूळ न ओलांडता फूट ओव्हरब्रीजचा वापर करून आपला जीव वाचविण्याची गरज आहे.
-आशुतोष पांडे, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, आरपीएफ, मध्य रेल्वे, नागपूर विभाग
...........