हिंमत असेल तर राहुल गांधी यांच्याविरोधात जाहीर आंदोलन करा; भाजप प्रदेशाध्यक्षांचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2023 07:33 PM2023-03-28T19:33:33+5:302023-03-28T19:34:20+5:30

Nagpur News जर खरोखरच शिवसेनेत हिंदुत्व शिल्लक असेल, तर राहुल गांधी यांच्याविरोधात जाहीर आंदोलन करून दाखवावे, असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

If you dare, protest publicly against Rahul Gandhi; BJP state president's challenge | हिंमत असेल तर राहुल गांधी यांच्याविरोधात जाहीर आंदोलन करा; भाजप प्रदेशाध्यक्षांचे आव्हान

हिंमत असेल तर राहुल गांधी यांच्याविरोधात जाहीर आंदोलन करा; भाजप प्रदेशाध्यक्षांचे आव्हान

googlenewsNext

नागपूर : काँग्रेस नेते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करत असल्याचा आरोप करत भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आपली व मुलाची खुर्ची वाचविण्यासाठी उद्धव ठाकरे हे सावरकर यांचा अपमान सहन करत आहेत. जर खरोखरच शिवसेनेत हिंदुत्व शिल्लक असेल, तर राहुल गांधी यांच्याविरोधात जाहीर आंदोलन करून दाखवावे, असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. मंगळवारी ते नागपूर प्रेस क्लबमध्ये पत्रपरिषदेदरम्यान बोलत होते.

राहुल गांधी सावरकर यांच्याबाबत बोलत असताना, उद्धव ठाकरे ठोस भूमिका घेऊन काँग्रेसचा हात का सोडत नाहीत? बाळासाहेबांनी हे सहन केले नसते. उद्धव ठाकरे मिंधे का झाले? त्यांना परत मुख्यमंत्रीपद हवे आहे. आम्ही हिंदुत्व सोडले, असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर करावे. ते नौटंकीबाज आहेत. अडीच वर्षांत राहुल गांधी यांना जाब का विचारला नाही, असा सवाल बावनकुळे यांनी केला. जर शिवसेना ढोंगी नसेल, तर ठाकरे किंवा राऊत यांनी राहुल गांधी यांच्या फोटोला चप्पल मारून दाखवावी, असेदेखील बावनकुळे म्हणाले

राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला असून, आम्ही या मुद्द्यावर जशास तसे उत्तर देऊ. भाजप राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढणार आहे, ३० मार्च ते ६ एप्रिल या कालावधीत राज्यातील सर्व विधानसभा क्षेत्रांमध्ये यात्रा निघणार असून, पूर्व विदर्भात आ. विजय रहांगडाले व प्रवीण दटके यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिंदे गटाचे आमदारदेखील यात सहभागी होणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.

राहुल गांधी, पटोलेंच्या डोक्यात फरक पडला आहे

राहुल गांधी एक तासदेखील काळ्या पाण्याची शिक्षा भोगू शकत नाहीत. राहुल गांधी यांची सावरकर यांच्यासमोर काहीच पात्रता नाही. नाना पटोले, राहुल गांधी यांच्या डोक्यात फरक पडला आहे. कुणावर टीका करत आहे, याचे भान त्यांना राहिलेले नाही. सावरकर यांचा इतिहास पुसण्याचे काम काँग्रेस नेते करत असून, आम्ही नेमका इतिहास नवीन पिढीपर्यंत घेऊन जाऊ, असे बावनकुळे म्हणाले.

Web Title: If you dare, protest publicly against Rahul Gandhi; BJP state president's challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.