ताप न आल्यास विश्वास बसेना; लस खरी की खोटी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:11 AM2021-09-08T04:11:23+5:302021-09-08T04:11:23+5:30
नागपूर : कोरोना प्रतिबंधक लस दिल्याचा खोटा देखावा करणारे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामुळे याचा सामान्य नागरिकांनी धसका ...
नागपूर : कोरोना प्रतिबंधक लस दिल्याचा खोटा देखावा करणारे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामुळे याचा सामान्य नागरिकांनी धसका घेतला आहे. विशेषत: जेव्हा लस घेऊन अनेकांना ताप किंवा इतर लक्षणे दिसून येत नसल्याने ते लसीकरण केंद्रावर जाऊन किंवा आपल्या डॉक्टरांना खरच लस दिली का, असा प्रश्न उपस्थित करताना दिसून येत आहेत.
कोरोनावर अद्याप ठोस उपचार नाही. यामुळे गंभीर परिणामांना रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. यामुळे १७ जानेवारीपासून सर्वच ठिकाणी लसीकरणाला सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात ‘हेल्थ केअर वर्कर्स’ तर दुसऱ्या टप्प्यात ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ला प्राधान्य देण्यात आले. सुरुवातीला या दोन्ही गटात लसीकरणाला घेऊन भीती होती. परंतु नंतर ती दूर होताच वेग वाढला. सध्या १८ वर्षांवरील सर्वांसाठी मोफत लसीकरण सुरू आहे. दरम्यानच्या काळात लसीचा तुटवड्यामुळे मंदावलेल्या लसीकरण मोहिमेने आता पुन्हा वेग धरला आहे. यामुळे अनेक शंकाकुशंकाही वाढल्या आहेत. यातच काही व्हिडिओने भर टाकली आहे. केवळ सुई टोचण्याचा देखावा केला जात असल्याचे हे व्हिडिओ आहेत.
-कोविशिल्डचा त्रास अधिक?
जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन खासगीमध्ये स्पुटनिक लस उपलब्ध आहे. परंतु यातील कोविशिल्डचा त्रास अधिक होत असल्याचे काहींच्या तक्रारी आहेत. परंतु तज्ज्ञानुसार, आपले शरीर लसीला कसा प्रतिसाद देते, त्यावर बरेच निर्भर असते. यामुळे अमूक लसीचा त्रास होतो, असे म्हणणे चुकीचे आहे. अद्याप यावर अभ्यास झालेला नाही.
-त्रास झाला तरच परिणामकारक असे अजिबात नाही
तज्ज्ञांनुसार, प्रत्येकाच्या शरीराची परिणामकारकता वेगवेगळी असते. त्यामुळे लस घेतल्यानंतर कोणाला ताप येऊ शकतो, तर कोणाला नाही. याचा अर्थ लसीकरणानंतर त्रास झाला तरच लस परिणामकारक आहे, असे अजिबात नाही. दोन्ही लसी परिणामकारक असून, सुरक्षित आहेत. त्यामुळे नागरिकांनी संभ्रमात न राहता मिळेल ती लस घेऊन कोविडपासून स्वत:चे व आपल्या कुटुंबीयांचे रक्षण करावे.
-लसीनंतर काहीच झाले नाही....
लसीचे दोन्ही डोस घेतले, परंतु दोन्ही वेळा ताप किंवा हात दुखला नाही. लस देताना टोचल्यासारखे वाटले नाही. लसीकरण केंद्रावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यांना प्रत्येक लसीची माहिती सरकार दरबारी द्यावी लागते.
- सुनंदा कांबळे, नागरिक
-डोस घेतल्यामुळेच वाचले
पहिला व दुसरा डोस घेतल्यानंतर कुठलाही त्रास झाला नाही. परंतु दुसऱ्या डोसनंतर साधारण १० दिवसांनी ताप आला. तपासणी केल्यावर कोविड पॉझिटिव्ह आलो. परंतु गंभीर लक्षणे नसल्याने होम क्वारंटाईन होऊन उपचार घेतले. परंतु लस घेतली नसती तर गंभीर परिणाम भोगावे लागले असते.
-राहुल देशभ्रत्तार, नागरिक
-त्रास झाला तरच परिणामकारक असे अजिबात नाही
लस घेतल्यावर सर्वांनाच ताप, अंगदुखी किंवा लस दिलेली जागा दुखेलच असे नाही. कारण, प्रत्येकाच्या शरीराची परिणामकारकता वेगवेगळी असते. याचा अर्थ लसीकरणानंतर त्रास झाला तरच लस परिणामकारक आहे, असे अजिबात नाही. दोन्ही लसी परिणामकारक असून, सुरक्षित आहेत. तसेच शासकीय लसीकरण केंद्रावर विश्वास ठेवायला हवा.
- डॉ. प्रशांत पाटील, प्रमुख, मेडिसीन विभाग, मेडिकल