दारू प्याल तर नोकरी गमवाल !
By admin | Published: December 31, 2016 02:48 AM2016-12-31T02:48:59+5:302016-12-31T02:48:59+5:30
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार : पोलीस आयुक्त वेंकटेशम यांचे आदेश
नागपूर : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. परंतु यात कुणी दारू पिऊन नवीन वर्ष साजरा करण्याचा प्रयत्न केला किंवा वाहन चालविताना सापडल्यास यावेळी पोलीस कठोर कारवाई करणार आहे.
दारू पिऊन गाडी चालविताना सापडल्यास नोकरीही संकटात येऊ शकते. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत की, पोलीस गस्त चमू आणि नाकाबंदी दरम्यान तैनात कर्मचाऱ्यांनी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांचे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे. इतकेच नव्हे तर दारू पिऊन गाडी चालवणाऱ्याची गाडीही जप्त होईल. संबंधितांचा फोटो आणि व्हीडिओ रेकॉर्डिंगसह संपूर्ण डाटा हा संबंधित पोलीस ठाणे, गुन्हे शाखा आणि विशेष शाखेसह सर्वच विभागांकडे उपलब्ध करून दिला जाईल. संबधित तरुण किंवा व्यक्ती नोकरीच्या वेळी जेव्हा पोलीस व्हेरिफिकेशन, व्हिसा किंवा पासपोर्टसाठी होणाऱ्या चौकशी दरम्यान ही माहिती कामी येईल. ही माहिती आधार कार्डशी सुद्धा जोण्यात येणार असल्याचा दावा केला गेला आहे. हा डाटा सेंट्रलाईज ठेवण्यात येणार असल्याचेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)