कोच मिळाल्यास दररोज धावणार दुरांतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 01:44 AM2017-09-01T01:44:06+5:302017-09-01T01:44:46+5:30
नागपूर-मुंबई दरम्यान दररोज धावणारी दुरांतो एक्स्प्रेस आता एक दिवसाआड चालण्याची शक्यता आहे. याबाबत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर-मुंबई दरम्यान दररोज धावणारी दुरांतो एक्स्प्रेस आता एक दिवसाआड चालण्याची शक्यता आहे. याबाबत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांनी सांगितले की, नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस आसनगाव-वासिंद दरम्यान अपघातग्रस्त झाल्यामुळे या गाडीचे नऊ कोच नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळे दोनपैकी केवळ एकच रेल्वेगाडी सध्या उपलब्ध आहे. दुरांतो एक्स्प्रेसचे कोच विशेष प्रकारचे असल्यामुळे त्याचा मध्य रेल्वेत तुटवडा आहे. त्यामुळे इतर रेल्वेतून कोचेसची व्यवस्था करण्यात येत आहे. या कोचेसची व्यवस्था होईपर्यंत ही गाडी एक दिवसआड चालविण्यात येणार आहे. याबाबत मुंबई येथील झोन मुख्यालय निर्णय घेणार असून निर्णय होताच त्याची माहिती प्रवाशांना देण्यात येईल, अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मध्य रेल्वे नागपूर विभागात १६ ते ३१ आॅगस्ट दरम्यान ‘स्वच्छ रेल्वे, स्वच्छ भारत’, पंधरवड्यानिमित्त ‘डीआरएम’कार्यालयाच्या सभागृहात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विभागातील सर्व अधिकाºयांना त्यांच्या बंगल्यावर गँगमनकडून काम करून घेणे बंद करण्याची ताकीद दिली. गँगमनने बंगल्याऐवजी फिल्ड ड्युटी करण्याची सूचना त्यांनी दिली. प्रशासन याबाबत गंभीर असून ज्याची ड्युटी जेथे आहे तेथे तो काम करताना दिसला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावेळी अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिलोक कोठारी, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कुश किशोर मिश्रा, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता परिवेश शाहु, जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील उपस्थित होते.
रेल्वे फ्रॅक्चरची आधीच होती माहिती
नागपूर रेल्वेस्थानकावर नुकत्याच तुटलेल्या रेल्वे रुळावरून गेलेली संपर्कक्रांती एक्स्प्रेस थोडक्यात बचावल्याबाबत प्रश्न उपस्थित केला असता डीआरएम गुप्ता म्हणाले, रेल्वेस्थानकावर रेल्वे रुळाच्या देखभालीचे काम सुरु होते. संबंधित तुटलेल्या रेल्वे रुळाच्या जागेची पाहणी करण्यात आली होती. त्यात सुधारणा होणार तेवढ्यात हा रुळ तुटला. खतौली येथील उत्कल एक्स्प्रेसच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले की, विभागात रेल्वे रुळांची सातत्याने देखभाल करण्यात येत आहे. कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी सावधानी बाळगण्यात येत आहे.
पंधरवड्यात २१४ प्रवाशांवर कारवाई
‘डीआरएम’ गुप्ता म्हणाले की, स्वच्छता पंधरवड्यात रेल्वे परिसर, स्टेशन, रेल्वेगाडी, पेंट्रीकार, बेसकिचन, शौचालय, कार्यालय आदी परिसरात स्वच्छतेबाबत निरीक्षण करून सुधारणा घडविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पंधरवड्यात घाण पसरविणाºया २१४ प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून २१४०० रुपये दंड वसूल करण्यात आला. २५ रेल्वेगाड्यातील पेंट्रीकारमधील स्वच्छतेचा आढावा घेण्यात आला. यातील काही गाड्यात कमतरता आढळली असून ती दूर करण्यासाठी निर्देश देण्यात आले. खाद्यपदार्थांच्या तपासणीचा अहवाल अद्याप आलेला नाही. ते म्हणाले की, पेंट्रीकारतर्फे अधिक किंमत वसूल करण्याच्या प्रकरणात मोठा दंड वसूल करण्यासाठी रेल्वे बोर्ड भर देत आहे.
जानेवारीपर्यंत मेकॅनाईज्ड लॉन्ड्री
अजनीत आठ टन क्षमतेची मेकॅनाईज्ड लॉन्ड्रीसाठी कंत्राट देण्यात आले आहे. त्यासाठी संबंधित कंत्राटदाराला जमीन देण्यात आली आहे. जानेवारीपर्यंत येथे लॉन्ड्री तयार होऊन आठ तासाच्या दोन पाळीत काम सुरू होईल, अशी अपेक्षा ‘डीआरएम’गुप्ता यांनी व्यक्त केली. लॉन्ड्री सुरू झाल्यानंतर रेल्वेगाड्यात देण्यात येणाºया बेडरोलमधील अस्वच्छ चादर, उशीची खोळ, ब्लँकेटची समस्या दूर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.