वेळ पडल्यास राजीनामाही देणार
By admin | Published: June 2, 2016 03:16 AM2016-06-02T03:16:20+5:302016-06-02T03:16:20+5:30
देशाच्या सभागृहात समाजाचे प्रश्न मांडण्याची संधी मला मिळाली आहे. त्या संधीचा निश्चितच फायदा होईल.
विकास महात्मे : धनगर आरक्षणाचा लढा सुरूच राहणार
नागपूर : देशाच्या सभागृहात समाजाचे प्रश्न मांडण्याची संधी मला मिळाली आहे. त्या संधीचा निश्चितच फायदा होईल. परंतु राज्यसभेचे पद मिळाले म्हणून मी चूप बसणार नाही. समाजाच्या प्रश्नासाठी आवाज उचलत राहणार. धनगर आरक्षणाचा प्रश्न १२ ते १५ महिन्यात मार्गी लागेल, असे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे. तेव्हापर्यंत वाट पाहू त्यानंतर पुन्हा आंदोलन करू. हा प्रश्न राज्य सरकारचा नाही, केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे. राज्य सरकारने केंद्राला शिफारस केल्यानंतर माझी भूमिका सुरू होईल, त्यामुळे तिथे प्रश्न मांडत राहणार. धनगर आरक्षणाच्या मुद्यावर वेळ पडलीच तर राजीनामा सुद्धा देईल, अशी घोषणा डॉ. विकास महात्मे यांनी केली.
भाजपातर्फे राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते बुधवारी नागपुरात आले. विमानतळ व त्यांच्या घरी कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. डॉ. विकास महात्मे म्हणाले, मला भाजपाने राज्यसभेची उमेदवारी दिल्यामुळे अनेक लोकं वेगळा अर्थ काढू लागले आहेत. काही जण म्हणत आहेत की धनगरांना आरक्षण द्यायचे नसल्यामुळेच महात्मे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु मी याचे खंडन करतो. कारण कुण्या एकट्यामुळे आंदोलन कधीच संपत नाही. एकाचे तोंड बंद केले म्हणून समाजाचा आवाज दाबता येत नाही. खर तर या खासदारकीमुळे आरक्षणाच्या आम्ही अधिक जवळ आलो आहोत. महाराष्ट्रातून केंद्राकडे शिफारसपत्र जाणारच. तेव्हा केंद्रात पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने एक खासदार म्हणून मी पूर्णत: प्रयत्न करील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मागील ६५ वर्षात धनगर समाजाला पहिल्यांदाच संसदेमध्ये प्रतिनिधित्व मिळाले आहे, याचा आनंद आहेच. परंतु १ कोटी २० लाख इतकी आमची संख्या असतांना आजवर केव्हाही राज्यसभेची किंवा लोकसभेची उमेदवारी समाजाला मिळू शकली नाही, ही दु:खाची बाब सुद्धा आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर आता केंद्रात पाठपुरावा करता येईल. महाराष्ट्राला पहिला धनगर खासदार दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे आभारही त्यांनी यावेळी मानले.
महादेव जानकर यांना शह देण्यासाठी उमेदवारी देण्यात आली असल्याचे बोलले जाते, असे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, जानकर हे भाजपचे मित्रपक्षाचे नेते आहेत. त्यामुळे मला तसे वाटत नाही. उलट माझा अर्ज भरताना ते सोबत होते. एकाच मुद्यावर आम्ही दोघेही लढा देत आहोत. ते राज्यात पाठपुरावा करतील मी केंद्रात करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. धनगड व धनगर हे एकच आहेत, याबाबत राज्य सरकार केंद्राला पत्र लिहू शकले नाही. कारण पूर्वीच्या राज्य सरकारने ते एक नाहीत, अशी शिफारस केली होती. त्यामुळे केंद्र सरकार यासंबंधात प्रश्न उपस्थित करेल, तसेच न्यायालयातही ही बाब मान्य केली जाणार नाही. त्यामुळे धनगरांना आरक्षण मिळालेच पाहिजे, यासाठी संपूर्ण संशोधनानुसार केंद्र सरकारला शिफारस केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)
स्वतंत्र विदर्भाची
भूमिका कायम
स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे, ही आपली भूमिका कायम आहे. याशिवाय जीवन कौशल्य हे अभ्यासक्रमात शिकविले जात नाहीत. समाज मानसिकरीत्या सबळ करायचा असेल तर जीवनकौशल्यांचा अंतर्भाव शिक्षणात असायला हवा या विषयावर मला काम करण्याची इच्छा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.