आहे कलेची आवड तर म्हातारपण नाही जाणार जड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:06 AM2021-07-03T04:06:23+5:302021-07-03T04:06:23+5:30

- शिवकुमार प्रसाद : दोन वर्षाची चिमुकली नात बनली गुरू - वयाच्या ८५व्या वर्षी साकारत आहेत ॲब्स्ट्रॅक्ट कलाकृती प्रवीण ...

If you love art, old age will not be heavy! | आहे कलेची आवड तर म्हातारपण नाही जाणार जड!

आहे कलेची आवड तर म्हातारपण नाही जाणार जड!

Next

- शिवकुमार प्रसाद : दोन वर्षाची चिमुकली नात बनली गुरू

- वयाच्या ८५व्या वर्षी साकारत आहेत ॲब्स्ट्रॅक्ट कलाकृती

प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शालेय, महाविद्यालयीन जीवनात कित्येक आकर्षणांचे अवडंबर असते आणि आपण हे करावे, असे बनावे असे स्वप्न रंगवत असतो. मात्र, करिअरच्या वाटा चोखाळत असताना आणि पुढे कौटुंबिक आयुष्याचा पसारा जोपासताना, रंगवलेले ते स्वप्न पोरखेळ वाटायला होतात. मात्र, ज्यांना दिवास्वप्न म्हणून आपणच हिणवत होतो, तेच उतारवयात तुमच्या जगण्याचे मजबूत आधार होतात आणि म्हातारपण एवढेही कठीण नसल्याची जाणीव होते. मिहान परिसरात ब्लुमडेल येथे वास्तव्यास असलेले ८५ वर्षीय आजोबा शिवकुमार प्रसाद यांच्याकडे बघितल्यास हा साक्षात्कार होतो.

एम. ए. प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती, एवढे शिक्षण असलेले शिवकुमार प्रसाद यांची व्यावहारिक आयुष्याची सुरुवात पाटणा, बिहार येथील रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या गॅजेटियर डिव्हिजन ब्रांचमधून रिसर्च असिस्टंट म्हणून झाली. पुढे त्यांनी नोकरी सोडून खासगी कंपनीमध्ये वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून क्षेत्र निवडले आणि एका नामांकित कंपनीतून उच्च पदावरून निवृत्त झाले. या काळात ते पाटणा, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये स्थानांतरित होत गेले. २००३-०४ मध्ये नाशिकला असताना त्यांची दोन वर्षांची चिमुकली नात अनुष्का त्यांच्याकडे कागद घेऊन येत असे आणि रेषा काढून सोडत असे. ‘यावर चित्र काढा आणि रंग भरा’ असा अधिकारवाणीचा आदेश तिच्याकडून मिळत असे. तेथून सुरू झाला शिवकुमार प्रसाद यांचा चित्रकलेतील प्रवास. दोन वर्षाच्या नातीने दिलेला गुरू उपदेश त्यांनी असा काही गिरवला आहे की आज त्यांची हजारो चित्रे सज्ज झाली आहेत. ही चित्रे साधीसुधी नाहीत. प्राचीन भारतीय पौराणिक इतिहासातील शिव, पार्वती, श्रीगणेश व कार्तिक यांच्या ॲब्स्ट्रॅक्ट छटा वेगळ्याच शैलीत त्यांच्या चित्रात बघायला मिळतात. त्यांचा हा प्रवास अव्याहत सुरू आहे आणि त्यातील मर्म रसिकांना धुंडाळायला सांगतात.

---------------

राफ्टर, घर बांधकामातील मसाला, धूर आदींतून साकारली चित्रे

घर बांधकामातील सेंट्रिंग्सचे फेकण्यात येणारे राफ्टर, लाकडी बत्ते, भिंतींना पुटिंग भरल्यानंतर त्यातून बाहेर पडणारे टाकाऊ पदार्थ, आगीतून-दिव्यातून निघणारा धूर, काजळी आदींच्या साहाय्याने त्यांनी चित्रे साकारली आहेत. ही चित्रे कधी ड्रॉईंग पेपर्सवर तर कधी मिळेल त्या साहित्यावर कोरलेली आहेत. लाकडी बत्त्यांच्या विशिष्ट आकाराला भाळून त्यांनी त्यावरच कल्पनाविष्कार साकारला आहे आणि विशेष म्हणजे ते बघणे रसिकाच्या आसक्तीचा विषय ठरतो. केशरी रंग हा त्यांच्या कलाकृतीचा प्रमुख आधार ठरतो. बरीच मुले काहीतरी रेखाटून कागद फेकून देतात. ते कागद घेऊन शिवकुमार प्रसाद अधुऱ्या चित्रांना पूर्णत्व देतात.

-----------------

स्टॅम्प पेपर, नाण्यांचा संग्रह

चित्रांसोबतच शिवकुमार प्रसाद यांच्याकडे देशविदेशातील स्टॅम्पपेपर्स व नाण्यांचा संग्रह आहे. ईस्ट इंडिया कंपनीने काढलेली राम, सीता, लक्ष्मण, श्रीकृष्ण आदींच्या १८१८च्या नाण्यांपासून ते इंग्लंडचे राज्यकर्ते जाॅर्ज, व्हिक्टोरिया आणि इतर देशांचे जुने जाणे आदींचा संग्रह त्यांच्याकडे आहे. यातील अनेक नाणी व स्टॅम्प चोरीलाही गेले आहेत.

--------------

नवल आश्रम आणि स्वातंत्र्यसंग्राम

पाटणा येथील नवल आश्रम हे शिवकुमार प्रसाद यांचे घर. येथे त्यांचे आजोबा बाबू नवल किशोर प्रसाद व त्यांचे मित्र पहिले राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद सोबतच वाढले. दोघेही वर्गमित्र होते. पुढे त्यांच्यात कोण वकील व कोण राजकारणात जाईल, हा करार झाला. दोघेही स्वातंत्र्यसंग्रामात होतेच. माझे आजोबा वकील झाले आणि राजेंद्रप्रसाद पुढे देशाचे पहिले राष्ट्रपती झाले. वडील बाबू देवेंद्र प्रसाद स्वातंत्र्यसंग्राम सैनिक होते. त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्यासोबत आणीबाणीत तुरुंगवास भोगल्याची आठवण शिवकुमार प्रसाद सांगतात.

...................

Web Title: If you love art, old age will not be heavy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.