पीओपी मूर्ती विकल्यास ‘खबरदार’, भरा १० हजाराचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:12 AM2021-09-05T04:12:29+5:302021-09-05T04:12:29+5:30
नागपूर : नागपूर जिल्ह्यात जवळपास एक हजारापेक्षा जास्त मूर्तिकार आहेत. सर्वच मूर्तिकार विविध उत्सवात मूर्तींची निर्मिती आणि विक्री करून ...
नागपूर : नागपूर जिल्ह्यात जवळपास एक हजारापेक्षा जास्त मूर्तिकार आहेत. सर्वच मूर्तिकार विविध उत्सवात मूर्तींची निर्मिती आणि विक्री करून वर्षाचा खर्च काढतात. मूर्ती तयार करण्याचा त्यांचा सीझनेबल व्यवसाय आहे. पण काही वर्षांपासून त्यांच्या व्यवसायावर पीओपी मूर्ती विक्रीने संकट आले असून, व्यवसाय लयास जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्याविरोधात पीओपी मूर्तीविरोधी कृती समिती आणि पारंपरिक मूर्तिकार व हस्तकला कारागीर संघाने लोकांना जागरूक करण्यासाठी चौकाचौकात ‘खबरदार’ असे होर्डिंग लावले आहेत.
नंदनवन, जगनाडे चौकात समितीने झळकविलेले होर्डिंग नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. लोकांना जागरूक करण्यासाठी होर्डिंगवर ‘पीओपी मूर्ती विक्री-खरेदी टाळू या, पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करू या’ असा संदेश प्रकाशित केला आहे. या माध्यमातून लोकांनी पर्यावरणविरोधी पीओपी गणेशमूर्ती खरेदी करू नका, मातीच्या मूर्ती खरेदी करून मूर्तिकारांना रोजगार उपलब्ध करून द्या, असाही संदेश लोकांना आम्ही होर्डिंगच्या माध्यमातून देत असल्याचे पीओपी मूर्तीविरोधी कृती समितीचे अध्यक्ष मूर्तिकार सुरेश पाठक यांनी सांगितले.
चितार ओळ येथील मूर्तिकार विनोद सूर्यवंशी म्हणाले, नागपुरात गणेशोत्सव, दुर्गाेत्सव, शारदोत्सव आदी उत्सवात मूर्ती विक्रीतून दरवर्षी २५ कोटींची उलाढाल होते. पण पीओपी मूर्तीमुळे हा व्यवसाय अर्ध्यावर आला आहे. तीन ते चार वर्षांपासून कच्च्या मालाच्या किमतीत दरवर्षी वाढ होत असल्याने नफा कमी झाला आहे. शिवाय मूर्तिकारांकडे कार्यरत कारागीर आणि मजुरांची रोजी वाढली आहे. या सीझनेबल व्यवसायावरच अनेकांच्या कुटुंबांचा खर्च निघतो. पण आता उत्पन्न कमी झाल्याने अनेकांनी दुसरे व्यवसाय शोधले आहेत. याशिवाय अनेक मूर्तिकारांची मुले उच्च शिक्षण घेऊन इतरत्र स्थायिक झाले आहेत. आता या व्यवसायात काम करायला कुणीही तयार नाही. याशिवाय सरकारचे पीओपी मूर्ती विक्रीचे धोरण मूर्तिकारांसाठी घातक ठरत आहे. सरकारने राज्यातील मूर्तिकारांसाठी काही प्रोत्साहनपर योजना आणि सबसिडी देण्याची मागणी सूर्यवंशी यांनी केली.