स्वत:ला श्रेष्ठ मानून शिकणे थांबविले तर पतनाला सुरुवात : मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 01:08 AM2019-01-23T01:08:57+5:302019-01-23T01:09:36+5:30

उत्तम होण्याची कोणती सीमा नसते. शिखरावर पोहचल्यानंतरही तेथे टिकून राहण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावे लागतात. आपण आता श्रेष्ठ झालो आहोत आणि काही शिकण्याची व सुधारण्याची गरज नाही, असा विचार मनात आला तर त्याच क्षणी तुमची प्रगती थांबते आणि पतनाकडे वाटचाल सुरू होते, असे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मांडले.

If you stop learning as your self, then start the fall: Mohan Bhagwat | स्वत:ला श्रेष्ठ मानून शिकणे थांबविले तर पतनाला सुरुवात : मोहन भागवत

स्वत:ला श्रेष्ठ मानून शिकणे थांबविले तर पतनाला सुरुवात : मोहन भागवत

Next
ठळक मुद्देक्रीडा भारतीतर्फे घोषवादन स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उत्तम होण्याची कोणती सीमा नसते. शिखरावर पोहचल्यानंतरही तेथे टिकून राहण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावे लागतात. आपण आता श्रेष्ठ झालो आहोत आणि काही शिकण्याची व सुधारण्याची गरज नाही, असा विचार मनात आला तर त्याच क्षणी तुमची प्रगती थांबते आणि पतनाकडे वाटचाल सुरू होते, असे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मांडले.
क्रीडा भारतीच्यावतीने रेशीमबागच्या हेडगेवार स्मृती परिसरात नुकतेच विदर्भ स्तराच्या प्रांतीय आंतरशालेय घोषवादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. भागवत यांनी आपले विचार मांडले. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ता शरद बागडी, मेजर जनरल (निवृत्त) अच्युत देव, विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ. अनिल करवंदे, रा.स्व. संघाचे महानगर संचालक श्रीधरराव गाडगे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. भागवत पुढे म्हणाले, तुम्हाला सतत आत्मचिंतन करीत राहणे गरजेचे आहे. स्पर्धेत शक्ती आणि बुद्धी दोन्हीची आवश्यकता असते. आपसातील ताळमेळ साधणे व सूर जुळणे आवश्यक आहे. देशातील विविध जाती, धर्म, पंथांच्या नागरिकांनी आपसात सूर जुळवून सोबत चालणे गरजेचे असल्याचे मनोगत त्यांनी मांडले.
यावेळी अध्यक्षीय भाषण करताना शरद बागडी म्हणाले, व्यक्तीपासून कुटुंब, कुटुंबापासून समाज आणि समाजामुळे देश निर्माण होतो. भारतीयांची समस्या ही आहे की येथे प्रत्येक व्यक्ती स्वत:ला १०० टक्के श्रेष्ठ मानते व इतरांना १०० टक्के चूक ठरविते. स्वत:ला सोडून इतरांना सुधारण्याचा प्रयत्न करते व यात देशावर, राजकारण्यांवर बोट ठेवून मोकळी होते. नागरिकांनी आत्मचिंतन करावे, स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्न केला तर देश आपोआप सुधारेल व प्रगती करेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मेजर अच्युत देव यांनीही आपले मनोगत मांडले.
स्पर्धेमध्ये अंतिम टप्प्यात पाईपर, झांज व इतर दोन गटात चुरस होती. यापैकी भोसला मिलिटरी शाळेच्या पाईप बॅन्डला प्रथम तर याच शाळेच्या झांज बॅन्डला द्वितीय पुरस्कार मिळाला. दुसऱ्या गटात बी.आर. मुंडले प्रथम, लोकमान्य टिळक विद्यालय द्वितीय व तळोधीच्या जे.एन. विद्यालयाने तृतीय क्रमांक पटकाविला. अकोल्याच्या के.जे.डी. प्लॅटिनम शाळेला प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आला. यावेळी अशोक दवंडे, विनय गाडगीळ, महेश घरोटे, सुधीर क्षीरसागर, मनीषा संत व कौस्तुभ लुले परीक्षक म्हणून उपस्थित होते. यानंतर ऋषिकेश लाखेने यांच्या बासुरीवर वंदेमातरमच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमात संघ कार्यवाह अरविंद कुकडे, सहकार्यवाह रवींद्र बोकरे, क्रीडाभारतीचे अ. भा. सहमंत्री प्रसन्न हरदास, संजय बाटवे, डॉ संजय खळतकर, प्रशांत पिंपळवार आदींचा सहभाग होता.

Web Title: If you stop learning as your self, then start the fall: Mohan Bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.