‘नोटा’ वापरले तर तोटा होईल; सरसंघचालकांचे सूचक वक्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 10:13 AM2018-10-20T10:13:41+5:302018-10-20T10:14:12+5:30
२०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या अगोदरच्या अखेरच्या विजयादशमी उत्सवातून पाथेय देताना सरसंघचालक डॉ.मोहन भागवत निवडणुकांवर काही भाष्य करतात का याकडे राजकीय वर्तुळाचेदेखील लक्ष लागले होते.
योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या अगोदरच्या अखेरच्या विजयादशमी उत्सवातून पाथेय देताना सरसंघचालक डॉ.मोहन भागवत निवडणुकांवर काही भाष्य करतात का याकडे राजकीय वर्तुळाचेदेखील लक्ष लागले होते. मतदानादरम्यान ‘नोटा’ वापरले तर तोटा होऊ शकतो. त्यामुळे सद्यस्थितीत जे पर्याय उपलब्ध आहेत, त्यापैकी सर्वोत्तम व राष्ट्रहिताला प्राधान्य देणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मतदारांनी मत द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. संपूर्ण देशात पसरलेले स्वयंसेवक मोठ्या संख्येने नागरिक म्हणून कर्तव्य पूर्ण करुन राष्ट्रहिताच्या बाजूने आपली शक्ती उभे करतील हे सूचक वक्तव्य करत त्यांनी स्वयंसेवकांना लोकसभा निवडणुकांसाठी अप्रत्यक्षपणे द्यायचा तो संदेशच दिला.
पक्षीय राजकारण, जातिसंप्रदायांच्या प्रभावाचे राजकारण यापासून संघ सुरुवातीपासूनच दूर राहत आला आहे व पुढेदेखील दूरच राहणार. मात्र संघाचे स्वयंसेवक नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडत असतात. मतदारांनी राष्ट्रहिताला सर्वतोपरी मानत स्वार्थ, संकुचित भावना, भाषा, प्रांत, जाती यापलिकडे जाऊन विचार केला पाहिजे.
उमेदवाराची प्रामाणिकता व क्षमता, पक्षाच्या धोरणाची राष्ट्रहितासोबतची प्रतिब्धता तसेच वर्तमान कार्यांचे अनुभव याआधारावर मतदारांनी मत दिले पाहिजे. मतदान न करणे किंवा ‘नोटा’च्या अधिकाराचा उपयोग करणे हे सर्वात अयोग्य असलेल्या उमेदवाराला फायदा पोहोचविणारे ठरते.
त्यामुळेच १०० टक्के मतदान आवश्यक आहे. भारताच्या निवडणूक आयोगाकडून १०० टक्के मतदानाचा आग्रह धरला जातो. या कर्तव्याचे पालन संघाचे स्वयंसेवक नेहमीप्रमाणे यंदादेखील करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्र सरकारला काढले चिमटे
यावेळी सरसंघचालकांनी केंद्र शासनाच्या कामाच्या गतीवरुन चिमटे काढले. स्वातंत्र्यानंतर कुठल्याच सरकारच्या कामाची गती वेगवान राहिली नाही. वर्तमान स्थितीतदेखील हेच चित्र आहे. शासनाच्या चांगल्या धोरणांवर प्रशासनाकडून तत्परता, संवेदनशीलता, पारदर्शकता व संपूर्णता दाखवत पावले उचलली गेली पाहिजे. मात्र असे आवश्यक त्या प्रमाणात होत नसल्याचे दिसून येते. इंग्रज केवळ आपल्या राज्यांवर सत्ता चालविण्याचे काम करायचे. आता स्वतंत्र भारतात आपल्या शासकांनी प्रशासनाला प्रजापालक प्रशासन बनवावे ही अपेक्षा आहे, असे प्रतिपादन डॉ. भागवत यांनी केले.