लग्न करायचेय, आधी तपासणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:09 AM2021-05-18T04:09:16+5:302021-05-18T04:09:16+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : दुसऱ्या लाटेत काेराेनाने ग्रामीण भागात पाय पसरल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : दुसऱ्या लाटेत काेराेनाने ग्रामीण भागात पाय पसरल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने निर्बंध सुरू केले. लग्न व सामाजिक कार्यक्रमांवर परवानगीशिवाय बंदी लावण्यात आली. ठरावीक उपस्थितीत लग्नासाठी सूट देण्यात आली. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून तालुक्यातील चिकना ग्रामपंचायतीने स्तुत्य उपक्रम राबविला. लग्न करायचेय तर आधी पाहुणे मंडळीची ऑक्सिजन लेव्हल व थर्मल तपासणी करा, असा निर्णय घेतला. आराेग्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतीचा निर्णय याेग्य असल्याचे मान्य करीत नवरदेवाकडील पाहुणे मंडळीने तपासणी करून घेतली.
झाले असे की, चिकना येथील राजेंद्र गजभिये यांच्या मुलीचे शुक्रवारी (दि. १४) लग्न ठरले हाेते. परंतु गावाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी असल्याने लग्नकार्यात कुठलीही आडकाठी न करता ग्रामपंचायत पदाधिकारी व काेराेनामुक्त गाव कृती समितीने एकत्रित येऊन लग्नातील पाहुण्यांच्या तपासणीचा निर्णय घेतला. ऑक्सिजन लेव्हल व थर्मल ताप माेजणी केल्यानंतरच पाहुण्यांना लग्नमंडपात प्रवेश दिला जाईल, असा निर्णय झाला. या निर्णयाची अंमलबजावणी आराेग्य कर्मचाऱ्यामार्फत करण्याचे ठरले. त्यानुसार नवरदेवाकडील पाहुणे मंडळीसह सर्व पाहुण्यांची ऑक्सिजन लेव्हल व ताप माेजणी करून त्यांना लग्नमंडपात प्रवेश दिला गेला. या लग्नसाेहळ्याला नियमानुसार फक्त २० वऱ्हाडी सहभागी झाले हाेते. तपासणीदरम्यान नवदाम्पत्याला शुभाशिष देण्यासाठी सरपंच बाबुराव माेटघरे, उपसरपंच तुळशीदास कळंबे, ग्रामसचिव अनिल लिंगायत, पाेलीस पाटील सूर्यकांता निकाेसे, ग्रा.पं. सदस्य नागाेराव मांढरे, आशा वर्कर मीना शिवरकर, अंगणवाडी सेविका निरुपाला माेटघरे, ग्रा.पं. कर्मचारी धम्मा माेटघरे, साेहम मांढरे आदी उपस्थित हाेते.