गुरू, शुक्र, शनि बघायचे तर रमन विज्ञान केंद्रात या; ग्रह, तारे पाहण्यासाठी ‘स्टार गेझिंग पार्टी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2021 08:07 PM2021-11-09T20:07:40+5:302021-11-09T20:08:19+5:30
Nagpur News दिवाळीच्या सुट्ट्यात अंतराळाची सफर करायची आहे, आपल्यापासून लाखाे किलाेमीटरवर फिरणारे गुरू, शुक्र, शनि बघायचे आहेत तर रमन विज्ञान केंद्रात या. हाेय केंद्राने खास विद्यार्थ्यांसाठी ‘स्टार गेझिंग पार्टी’ अरेंज केली आहे.
नागपूर : दिवाळीच्या सुट्ट्यात अंतराळाची सफर करायची आहे, आपल्यापासून लाखाे किलाेमीटरवर फिरणारे गुरू, शुक्र, शनि बघायचे आहेत तर रमन विज्ञान केंद्रात या. हाेय केंद्राने खास विद्यार्थ्यांसाठी ‘स्टार गेझिंग पार्टी’ अरेंज केली आहे.
रमन विज्ञान केंद्रातर्फे ८ ते १५ नाेव्हेंबरपर्यंत हा खास इव्हेंट आयाेजित केला आहे. दरराेज सूर्यास्तानंतर ७.३० वाजतापर्यंत केंद्रातील टेलिस्काेपद्वारे अवकाशातील ग्रहताऱ्यांनी पाहण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. केंद्राचे शिक्षक महेंद्र वाघ यांनी सांगितले, सध्या आपल्या सूर्यमालेतील तीन माेठे ग्रह पृथ्वीच्या जवळून भ्रमंती करीत आहेत. सर्वात माेठा असलेला गुरू सूर्याच्या विरुद्ध दिशेने पृथ्वीजवळून परिक्रमा करीत आहे.
याशिवाय आकर्षक दिसणारा शुक्र आणि शनि ग्रहसुद्धा पृथ्वीच्या जवळून भ्रमंती करीत आहे. हे तिन्ही ग्रह काही लाख किलाेमीटर अंतरावर आहेत. सूर्यास्तानंतर आकाशात त्यांचे दर्शन घडू शकते, पण उघड्या डाेळ्यांनी त्यांना समजणे कठीण आहे. त्यामुळे केंद्रातील शक्तिशाली टेलिस्काेपद्वारे विद्यार्थ्यांना हे ग्रह पाहता यावे, त्यांच्या भ्रमणाचे अवलाेकन करता यावे, यासाठी रमन विज्ञान केंद्राने हा खास उपक्रम आयाेजित केला आहे.
याशिवाय आपल्या पृथ्वीचा उपग्रह म्हणजे चंद्र आणि आकाशातील ताऱ्यांना पाहण्याची, त्यांच्या हालचाली टिपण्याची खास संधी यातून देण्यात आली आहे. केंद्राचे सदस्य असलेल्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क प्रवेश राहणार आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रातर्फे करण्यात आले आहे.