ढाण्या वाघ बघायचा असेल तर कवाडेंकडे बघा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 11:22 PM2018-05-05T23:22:05+5:302018-05-05T23:22:28+5:30
काही लोक स्वत:च स्वत:चे मोठमोठे होर्डिंग्ज लावून ढाण्या वाघ लिहितात. पण ढाण्या वाघ कसा असतो ते पहायचे असेल तर २० वर्षांपूर्वीचे प्रा. जोगेंद्र कवाडे बघा, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कवाडे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काही लोक स्वत:च स्वत:चे मोठमोठे होर्डिंग्ज लावून ढाण्या वाघ लिहितात. पण ढाण्या वाघ कसा असतो ते पहायचे असेल तर २० वर्षांपूर्वीचे प्रा. जोगेंद्र कवाडे बघा, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कवाडे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला.
लॉँग मार्चचे प्रणेते आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा अमृत महोत्सवी सोहळा रविवारी देशपांडे सभागृहात पार पडला. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रा. कवाडे यांचा पत्नी रंजनाताई यांच्यासह मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे होते. यावेळी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, अमृत महोत्सव सोहळा आयोजन समितीचे कार्याध्यक्ष माजी मंत्री नितीन राऊत, माजी मंत्री अनिल देशमुख, संयोजक गिरीश गांधी, अध्यक्ष अटलबहादूर सिंग, माजी मंत्री अॅड. सुलेखा कुंभारे, इ.मो. नारनवरे. आ. प्रकाश गजभिये आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रा. कवाडे यांनी काढलेल्या लॉँग मार्चने मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनाची दिशाच बदलली. त्यांच्या एका आवाजाने तरुणाई रस्त्यावर उतरली. तरुणाईच्या मनातील नायक म्हणून त्यांनी काम केले. कवाडेंच्या शब्दात अंगार होती. एखाद्या सभेला आग लावण्याची ताकद त्यांच्या वक्तृत्वात होती. मात्र, आक्रमकता व संयमी रुप दोन्हींचा योग्यरीतीने वापर करून त्यांनी समाजाचे काम केले. ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते, पण त्यांनी स्वत:च्या अर्थकारणाकडे कधीच लक्ष दिले नाही. तत्वांशी तडजोड न करताही ज्यांचे विचार पटत नाही त्यांच्याशी वैयक्तिक वैर न ठेवण्याचे तत्त्व त्यांनी पाळले. कवाडे सरांच्या कार्याचा, संघर्षाचा हा सत्कार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
तेच जॅकेट अन शाल
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून आपण सर्व प्रा. कवाडे यांना पाहतो आहोत. तेच जॅकेट अन शाल. होती तशीच वेशभूषा आजही कायम आहे. त्यांचा शतकपूर्ती सत्कार असाच करण्याचा योग लाभो, अशी प्रार्थनाही मुख्यमंत्र्यांनी केली.
संभाजी भिडे मोकाट कसा ? : प्रा. कवाडे
भीमा कोरेगावच्या जखमा घेऊन येथे सर्व लोक बसले आहेत. समाज अस्वस्थ आहे. संभाजी भिजे अजून मोकाट दिसतो आहे. मुख्यमंत्री महोदय आपण या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होईल व चौकशी अहवालात दोषी आढळणाऱ्यावर कारवाई होईल, असे म्हटले होते. पण न्यायालयीन चौकशीच झाली नाही. अहवालच आला नाही. असे असतानाही भिडेला क्लीन चिट दिल्याच्या बातम्या कशा आल्या, असा सवाल प्रा. कवाडे यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना सत्काराला उत्तर देताना केला. प्रा. कवाडे म्हणाले. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात संविधान समीक्षेचा विषय निघाला तेव्हा संसदेत बोलताना आपण संविधान बदलण्यासाठी पुढे येणारे हात ठेचण्याचा इशारा दिला होता, असे सांगत येणारा प्रत्येक क्षण शोषित, वंचित व उपेक्षितांसाठी समर्पित करण्याचे आपले ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशात वाह्यात समाज व्यवस्था आहे. मानवी मूल्याचे वाटोळे करून टाकले आहे. ही समाज व्यवस्था बदलण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. सलग १६ वर्षांच्या संघर्षानंतर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरणाची घोषणा झाली. विद्यापीठाच्या प्रवेश द्वारावर आपण निळा टिळा लावला. तो आपल्या आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण होता, असे सांगत त्या आंदोलनात माझ्यासोबत गोपीनाथ मुंडे व गंगाधरराव फडणवीस हे देखील तुरुंगात गेले होते, अशी आठवणही त्यांनी सांगितली.
गडकरींनी दिल्या शुभेच्छा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विमान नागपुरात उशिरा पोहचले. त्यांनी कार्यक्रमस्थळी पोहचून प्रा, कवाडे यांचा सपत्नीक सत्कार केला. त्यांच्या कार्याचा गौरव करीत निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
नितीन राऊत म्हणाले, लॉँग मार्चच्या लढ्यातून भीमसैनिक हा शब्द मिळाला. प्रा. कवाडे यांना बघितले की महात्मा फुले यांची आठवण येते. कवाडे यांनी आयुष्यभर अन्यायग्रस्तांसाठी लढा दिला. दलितांचा आवाज बुलंद केला. देशाची वर्तमान स्थिती वाईट आहे. दलितांवर अन्याय, अत्याचार होत आहेत. महिलांवर बलात्कार होत आहेत. आजचा हा सत्कार या व्यवस्थेला छेद देणारा ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कवाडे हे विदर्भातील एक लढवय्ये नेतृत्व असल्याचे गौरवोदगार सरदार अटलबहादूर सिंग यांनी काढले. अनिल देशमुख यांनीही कवाडेंमधील आंदोलकाचे विविध दाखले दिले.
सर्वंकष दलित चळवळ उभी रहावी : सुशीलकुमार शिंदे
जोवर सर्वंकष दलित चळवळ उभी राहत नाही, जेव्हा सर्वांना सोबत घेऊन जाण्याची प्रक्रिया सुरू होईल, तेव्हाच आमच्यातील अस्पृश्यता दूर होईल, असा विचार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मांडला. शिंदे म्हणाले, विचारांचे वेड ज्यांच्या मनात असते तो नेहमी पेटून उठत असतो. त्याची आग ओकण्याची पद्धतही समाजाला कळत असते. संघर्ष करा व सत्तावान बना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हा मार्ग दिला. प्रा. कवाडे हे देखील तोच मार्ग सांगतात. कवाडे हे विचारांचे आॅपरेशन करणारे प्राध्यापक आहेत. त्यांनी कमी काळात संसद गाजविली होती, असेही त्यांनी सांगितले.
समता सैनिक दलातर्फे सत्काराविरुद्ध पत्रक
दरम्यान भाजपा सरकारकडून प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी सत्कार स्वीकारू नये, अशी विनंतीपर मागणी करणारे पत्रक समता सैनिक दलातर्फे आमदार निवासासमोर वितरित केले जात होते. पत्रक वितरित करणाºया कार्यकर्त्यांना सीताबर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले.
कोरेगाव भीमा येथे भीमसैनिकांवर हल्ला झाला. या हल्ल्यातील मुख्य आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी संपूर्ण देशात आंदोलन पेटले, तरीही आरोपीला वाचवण्याचे काम भाजपाचे राज्य व केंद्रातील सरकार करीत आहे. त्यामुळे अशा सरकारकडून आंबेडकरी चळवळीतील नेते असलेल्या प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी सत्कार स्वीकारू नये, असे समता सैनिक दलाचे म्हणणे होते. त्यासंदर्भात त्यांनी पत्रक काढले होते. ते पत्रक वसंतराव देशपांडे सभागृहाबाहेर आमदार निवासासमोर वाटले जात होते. पोलिसांना याची माहिती होताच त्यांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तसेच कार्यक्रमात गोंधळ होण्याच्या भीतीने देशपांडे सभागृह आणि परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.