जीवनात टिकून राहायचे असेल तर आव्हाने स्वीकारायला शिका - कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी
By आनंद डेकाटे | Published: February 9, 2024 05:53 PM2024-02-09T17:53:24+5:302024-02-09T17:53:50+5:30
शिक्षणाला फुलस्टॉप लागू नये म्हणून आपल्याला पुन्हा-पुन्हा शिकावे लागेल. जीवनाच्या या स्पर्धेत आपल्याला टिकून राहायचे असेल तर आव्हाने स्वीकारायला शिका, असे आवाहन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी येथे केले.
नागपूर : नैसर्गिक बुद्धिमत्तेसोबतच आता कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशअल इंटलेजन्स) सुद्धा आले आहे. बुद्धिवंतांचा पर्याय उपलब्ध झाला आहे. हवी असलेली सर्व माहिती मोबाईलवरच उपलब्ध आहे. आपल्याला लागणारे ट्रेनर संपले. प्रोफेशनल्स रिप्लेस होतील, अशा परिस्थितीत वेगळीच स्पर्धा राहणार आहे. शिक्षणाला फुलस्टॉप लागू नये म्हणून आपल्याला पुन्हा-पुन्हा शिकावे लागेल. जीवनाच्या या स्पर्धेत आपल्याला टिकून राहायचे असेल तर आव्हाने स्वीकारायला शिका, असे आवाहन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी येथे केले.
शासकीय तंत्रनिकेतनचा २६ वा पदविका प्रदान सोहळा शुक्रवारी राजनगर येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाचे संचालक राम क्षीरसागर व शासकीय तंत्रनिकेतन नागपूरचे प्राचार्य व नियामक मंडळाचे सदस्य सचिव डॉ. मनोजकुमार डायगव्हाणे हे विशेष अतिथी होते. शासकीय तंत्रनिकेतन नागपूरच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय जाधव हे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी एकूण ६१५ विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आली. यासोबतच गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, रौप्य पदक, पारितोषिकांसह रोख पुरस्कारही प्रदान करण्यात आले.
कुलगुरू डॉ.चौधरी म्हणाले, आर्टिफिशअल इंटलिजन्स ही आता आपली गरज झाली आहे. प्रत्येक क्षेत्रात त्याचा वापर करण्याची आवश्यकता आहे. आता एका विषयात तज्ज्ञ होण्याचे दिवस राहिले नाही. तर सर्वच गोष्टीचे थोडेथोडे ज्ञान असणे आवश्यक झाले आहे.
राम क्षीरसागर व डॉ. दत्तात्रय जाधव यांनीही मार्गदर्शन केले. डॉ. मनोजकुमार डायगव्हाणे यांनी शासकीय तंत्रनिकेतनने वर्षभरात केलेल्या कार्याची माहिती दिली.
अविना डांगेने पटकावले सुवर्णपदासह आठ पुरस्कार
डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन टेकनॉलॉजी शाखेतील अविना संजय डांगे या विद्यार्थिनीने ९७.९० टक्के गुण घेऊन सर्व विभागातून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच एक सुवर्णपदकासह आठ प्रायोजित पारितोषिकेही पटकावली. तिच्या हातूनच सर्व विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. तसेच डिप्लोमा इन कम्युटर इंजिनियरिंगमध्ये इशा खुटाफळे या विद्यार्थिनीने ९७.५ टक्के घेतले. यासोबतच शिवम पटले याने एक सर्वणसह दोन पुरस्कार पटकावले.