गडचिरोलीत महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्षच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 01:14 AM2018-04-01T01:14:35+5:302018-04-01T01:14:46+5:30
महिलांच्या आरोग्याला घेऊन नागपुरातच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये अद्ययावत उपचार उपलब्ध आहेत, त्यातुलनेत गडचिरोली जिल्हा खूपच मागे पडला आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांच्या सामान्य रोगाचेही निदान होत नाही. याविषयी परिचारिकांनाही विशेष प्रशिक्षण प्राप्त नसल्याने समस्यात भरच पडते. शिवाय, महिलांमध्ये महिलांच्या आजाराविषयी जागृती नसल्याने आजाराचा धोका वाढत असल्याचे मत, सर्च संस्था गडचिरोलीच्या सहनिदेशिका डॉ. राणी बंग यांनी येथे व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिलांच्या आरोग्याला घेऊन नागपुरातच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये अद्ययावत उपचार उपलब्ध आहेत, त्यातुलनेत गडचिरोली जिल्हा खूपच मागे पडला आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांच्या सामान्य रोगाचेही निदान होत नाही. याविषयी परिचारिकांनाही विशेष प्रशिक्षण प्राप्त नसल्याने समस्यात भरच पडते. शिवाय, महिलांमध्ये महिलांच्या आजाराविषयी जागृती नसल्याने आजाराचा धोका वाढत असल्याचे मत, सर्च संस्था गडचिरोलीच्या सहनिदेशिका डॉ. राणी बंग यांनी येथे व्यक्त केले.
इंडियन सोसायटी आॅफ अॅनेस्थिशियालॉजिस्ट, नागपूर शाखेचा पदग्रहण सोहळा शनिवारी पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला इंडियन सोसायटी आॅफ अॅनेस्थिशियालॉजिस्ट महाराष्टÑ राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. हितेंद्र महाजन उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत इंडियन सोसायटी आॅफ अॅनेस्थिशियालॉजिस्ट, नागपूर शाखेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. सुनीता लवंगे व सचिव डॉ. उमेश रामतानी यांनी पदभार स्वीकारला.
डॉ. बंग म्हणाल्या, गडचिरोली ग्रामीण रुग्णालयात केवळ दोन स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ आहेत. बधिरीकरण तज्ज्ञ तर नावालाही नाही. यामुळे शस्त्रक्रियांवर याचा प्रभाव पडतो, असे भयानक चित्र आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनांचाही लाभ गडचिरोलीतील रुग्णांपर्यंत पोहोचत नाही. कारण अनेकांकडे या योजनेतील रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी पैसा नसतो. शासनाने या सर्व समस्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
प्रास्ताविक मावळत्या सचिव डॉ. गौरी अरोरा यांनी केले तर गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाची माहिती मावळते अध्यक्ष डॉ. शीतल दलाल यांनी दिली. येत्या वर्षभरात आयोजित करण्यात येणाऱ्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमाची माहिती डॉ. सुनीता लवंगे यांनी दिली. आभार डॉ. उमेश रामतानी यांनी मानले.
-बधिरीकरण तज्ज्ञ पडद्यामागील कलावंत
डॉ. बंग म्हणाल्या, बधिरीकरण शास्त्रात झालेल्या प्रगतीमुळेच दुर्गम भागातही यशस्वीरीत्या सर्जरी करणे शक्य झाले आहे. हे डॉक्टर पडद्यामागील कलावंत आहेत. भूलतज्ज्ञ म्हणजे माणसाशी माणसासारखं नातं जपणारा डॉक्टर आहे, असे म्हणत त्यांनी समाजात डॉक्टरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला असल्याचे सांगून, बधिर झालेल्या समाजाला जागृत करण्याचे कार्यही प्रत्येकाने हाती घेण्याचे आवाहनही केले.