दिव्यांगांच्या लसीकरणाकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:07 AM2021-04-10T04:07:37+5:302021-04-10T04:07:37+5:30
नागपूर : कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. स्थानिक प्रशासनाकडून संक्रमण टाळता यावे म्हणून लसीकरणावर भर दिला जातो आहे. महापालिकेने ...
नागपूर : कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. स्थानिक प्रशासनाकडून संक्रमण टाळता यावे म्हणून लसीकरणावर भर दिला जातो आहे. महापालिकेने तर लसीकरण अभियानदेखील राबविले आहे. पण या अभियानात दिव्यांगांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. दिव्यांगांच्या कल्याणासाठी प्रशासनासोबत काम करणाऱ्या संस्थांनीही दिव्यांगांच्या लसीकरणाकडे पाठ फिरविली आहे.
नागपूर महापालिकेतर्फे लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे. यात रिक्षा व ऑटो ड्रायव्हर, ट्रान्सपोर्ट, डिलिव्हरी बॉय, फळ विक्रेता, लेबर, हॉकर्स, हॉटेल कर्मचारी, फार्मासिस्ट आदींचे लसीकरण करण्यात येणार आहे. परंतु दिव्यांग बांधवांना यात उपेक्षित ठेवण्यात आले आहे. या अभियानात दिव्यांग बांधवांसाठी कुठलाही विशेष दिवस नाही, विशेष व्यवस्था नाही. दिव्यांगांना लसीकरण आवश्यक असतानाही अभियान राबविणारे दिव्यांगांपर्यंत पोहचत नाही. दिव्यांगांना सामान्यापेक्षा कोरोना संक्रमणाची शक्यता जास्त असते. त्यांना चालताना, उठता-बसताना सहकार्य घ्यावे लागते. त्यामुळे दिव्यांगांना संक्रमणाचा धोका जास्त असतो. त्यामुळे दिव्यांग बांधवांनाही लसीकरण अभियानात सहभागी करून घ्यावे, त्यांच्यासाठी लसीकरणाची स्वतंत्र सोय करण्यात यावी, अशी मागणी डिसेबिलिटी राईट्स अॅक्टिव्हिस्ट वर्मा तेलंग यांनी केली आहे. ४५ वर्षांवरील दिव्यांगांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. ते लसीकरण केंद्रावर येऊ शकत नसेल तर त्यांच्या घरी जाऊन लसीकरण करावे, अशी मागणी राष्ट्रीय विकलांग कल्याण संस्थाचे अध्यक्ष त्र्यंबक मोकासरे यांनी केली आहे.
ज्या संस्था दिव्यांगांसाठी काम करतात, त्यांनी प्रशासनाला दिव्यांगांच्या अवस्थेची जाणीव करून देत प्रशासनाला लसीकरणासाठी बाध्य करावे, अशीही मागणी दिव्यांग बांधवांकडून होत आहे.